नंदुरबार जिल्ह्य़ातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पुण्यातील तरुणांनी पुढाकार घेतला असून गेल्या पाच वर्षांत साडेतीन हजार कुपोषित बालकांना पोषण आहार पुरवून सशक्त बनवण्याचे काम समृद्धम फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहे. येत्या काळात प्रत्येक कुपोषित बालकापर्यंत पोहोचण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे.

समृद्धम फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पांचाळ म्हणाले, नंदुरबार जिल्ह्य़ातून शिक्षण आणि नोकरीसाठी पुणे शहरात आलेल्या काही मित्रांनी एकत्र येऊन आपल्या गावासाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला. नेमके काय करायचे याबाबत विचार सुरू असताना नंदुरबार जिल्ह्य़ातील कुपोषित बालकांच्या संख्येने आमचे लक्ष वेधले आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी काम करायचे ठरवले. मुलांची आरोग्य तपासणी करून वजन आणि उंची कमी असलेल्या कुपोषित मुलांसाठी पोषण आहार पुरवण्यास सुरुवात केली.

विजय पांचाळ यांनी त्यांच्या बारा मित्रांच्या सहकार्याने २०१३ मध्ये ही मोहीम हाती घेतली. पोषण आहार पुरविण्यात आलेल्या कुपोषित बालकांची दर दोन महिन्यांनी आरोग्य तपासणी केली जाते.

या मोहिमेसाठी पुणे, नंदुरबार आणि शहादा येथे बारा जणांचा संघ काम करत आहे. फाउंडेशनतर्फे नुकत्याच राबविण्यात आलेल्या एका शिबिरात चाळीसगाव तालुक्यातील (जि. जळगाव) टाकळीगाव, हिरापूर, वाघडू आणि वाकडी या गावांतील २२०० कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषण आहार पुरविण्यात आला. विशेष म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये आपली नोकरी आणि व्यवसाय करणारे हे युवक पदरमोड करून ही मोहीम राबवीत आहेत. २०२० पर्यंत तीस हजार कुपोषित बालकांपर्यंत पोहोचण्याचा समृद्धम फाउंडेशनचा संकल्प आहे. त्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडी तसेच आशा सेविका यांची मदत घेतली जाते. जळगाव आणि इतर जिल्ह्य़ांमधील आदिवासींपर्यंत पोहोचण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे पांचाळ यांनी सांगितले.

जास्तीत जास्त कुपोषित बालकांपर्यंत पोषक खाद्य पोहोचवता यावे म्हणून जनतेकडून निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी आर्थिक मदतीसाठी ९६६५८२४६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पांचाळ यांनी केले.