श्रीराम ओक

विविध चित्रपट तसेच विविध माहितीपट प्रोजेक्टर आणि लॅपटॉपच्या साहाय्याने बघण्याची संधी वस्तीमधील मुलांना उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सुटीत मुलांसाठी ग्रंथालयाची सहल देखील संजय गायकवाड आयोजित करतात.

मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे म्हणून त्यांना व्यक्तिमत्त्व विकसनाची विविध माध्यमे पालक जागरूकतेने उपलब्ध करून देतात. मुलांना शिबिरात घालणे, वाचनालयांमध्ये नावनोंदणी करणे, मुलांना पुस्तके-खेळणी आणून देणे, त्यांना चित्रपटांना घेऊन जाणे, सहलींचे आयोजन करणे या सगळ्यांमधून मुलांना सुटीचा आनंद उपभोगता यावा म्हणून हरतऱ्हेचे प्रयत्न पालक करत असतात. ज्या पालकांकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी हे सगळे ठीक आहे, पण ज्यांचे पोट हातावर आहे ते पालक त्यांच्या मुलांच्या सुटीच्या आनंदासाठी काय करू शकणार, मग ती मुले दिवसभर इकडे-तिकडे बागडतात, काही वेळा चुकीच्या मार्गाला वळतात. अतिधाडसापोटी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला घरात कोणी उपलब्ध नसल्यामुळे नदीवर, कॅनॉलवर पोहायला जातात, त्यामुळे काही वेळा काही आपत्तींना देखील त्या मुलांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांना सामोरे जावे लागते. वस्ती पातळीवरील मुलांच्या या समस्या लक्षात घेऊन पीएमपीमध्ये २००९ पासून वाहक म्हणून नोकरी करणारे संजय गायकवाड आपल्या उपलब्ध वेळेचा सदुपयोग तर करतातच, पण या मुलांना सुटीचा आनंद उपभोगायला मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात. मुळा रस्ता परिसरात राहणारी पाचवी ते दहावीची सुमारे साठ मुले सुटीचा आनंद घेऊ शकतात, तो संजय यांच्यामुळे. सुटीच्या निमित्ताने ज्ञान-मनोरंजन अशा दोन्ही पातळीवर त्यांच्या आनंदात भर घालत असतानाच वर्षभर आरोग्यविषयक  जनजागृती करण्याबरोबरच त्यांना आरोग्यसेवाही अत्यल्प शुल्कात, वेळप्रसंगी मोफत देखील संजय त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात. आपली नोकरी सांभाळून विविध पातळ्यांवर सामाजिक कार्य करणाऱ्या संजय यांनी सुमारे अठरा वर्षांपूर्वी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला आरोग्य शिबिरे, रक्त तपासणी, वारकऱ्यांना अन्नदान अशा विविध कामांनी त्यांच्या कार्याला सुरुवात झाली.

मागील सहा वर्षांपासून पुणे मराठी ग्रंथालयाच्या साहाय्याने सुटीचे दोन महिने बाल वासंतिक वाचनालयाची कल्पना ग्रंथालयाचे उपाध्यक्ष दिलीप ठकार यांनी सुचविल्यापासून सुरू करण्यात आली. यामुळे मुलांना मराठी तसेच इंग्रजी पुस्तके देखील वाचायला मिळू लागली. या शिवाय यंदाच्या वर्षीपासून अक्षरभारतीच्या माध्यमातून आता मुलांना हिंदी पुस्तके देखील वाचायला मिळणार आहेत. मागील वर्षीपासून वस्तीमध्ये प्रोजेक्टर आणि लॅपटॉपच्या साहाय्याने मुलांसाठी निर्मिती झालेले विविध चित्रपट तसेच विविध माहितीपट बघण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली. प्रसाद अत्रे यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सुटीत एकदा मुलांसाठी ग्रंथालयाची सहल देखील संजय आयोजित करतात. यासाठी स्वत:च्या तसेच मित्रांच्या रिक्षांमधून मुलांना पुणे मराठी ग्रंथालयात घेऊन येतात. त्यांना ग्रंथालय दाखविण्यापासून एखादा चित्रपट दाखवणे, खाऊ देणे असा उपक्रम देखील ते राबवितात. यंदाच्या वर्षीपासून त्यांनी पुस्तकांच्याबरोबरीने खेळण्यांचे ग्रंथालय देखील सुरू केले आहे. मुलांना सुटय़ांमध्ये विविध बौद्धिक खेळ खेळता यावेत या उद्देशाने त्यांनी हे ग्रंथालय सुरू केले आहे. संजय यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी वैजंयता यांचे देखील सहकार्य असते. पूनम इको व्हिजनच्या माध्यमातून कपडय़ांपासून पिशव्या आणि उपयुक्त वस्तू त्या बनवून देतात. तीन मुलींना सांभाळत गायकवाड दाम्पत्य सतत कार्यमग्न असते. संजय आपल्या नोकरी आणि सामाजिक कार्याच्या निमित्ताने तर वैजयंता घर आणि सामाजिक कार्याच्या निमित्ताने. याशिवाय मुलांना व्यक्त होता यावे यासाठी संवाद कट्टय़ाच्या माध्यमातून मुलांना गोष्टी सांगणे. त्यांना गोष्टी, त्यांचे अनुभव सांगायला प्रोत्साहित करणे हा उपक्रम देखील संजय राबवितात. यामध्ये संजीवनी अत्रे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते.

मुलांना वाचनसंस्कृतीचा भाग होता यावे म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या संजय यांना आपले नोकरीतील सहकारी, त्यांच्या ताणांची देखील जाणीव आहे आणि त्यामुळेच शिवाजीनगर येथील बस डेपोत वाचनालय सुरू करण्यासाठी देखील त्यांनी मागील वर्षी पुढाकार घेतला आणि तेथे देखील पुणे मराठी ग्रंथालयाच्या मदतीने वाचनालय सुरू करण्यात आले. संजय यांचे आणि त्यांच्या पत्नीचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटलेले असल्यामुळे सगळ्यांनी शिकले पाहिजे आणि पुढे जायला हवे ही त्यांची भावना आहे. यामुळेच ज्या मुलांना पितृछत्र नाही, त्यांना मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यापासून शिक्षणात हुशार आहे, पण ऐपत नाही, त्या मुलांचे परीक्षा शुल्क भरण्यास ते सहजतेने पुढे येतात. आपल्या भागात कोणालाही मदतीची गरज लागली, वेळीअवेळी कोणाला रिक्षा लागली, तर पैशांची कोणतीही अपेक्षा न करता त्यांना आपल्या रिक्षातून ते घेऊन जातात. रोजचा सकाळचा दोन तासांचा वेळ आणि इतर वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, सुटीच्या दिवशी देखील त्यांना सामाजिक कार्याचा ध्यास असतो. शांत स्वभावाचे संजय मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना हरखून जातात. मुलांनी सुटीपुरतेच नाही, तर कायमस्वरूपी आनंदी, ताणविरहित, सक्षम राहावे यासाठी झटणाऱ्या संजय यांनी आनंद देण्याचा वसाच घेतला आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल, तुम्हालाही आनंद वाटायचा असेल, तर संजय यांना ९५६१७८४४०३ या क्रमाकांवर संपर्क साधता येईल.

shriram.oak@expressindia.com