दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमासाठी विविध राज्यातून अनेकजण गेले होते. तसेच परदेशी नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याच समोर आलं आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून देखील अनेकजण या ठिकाणी गेले होते. त्यापैकी  २३ जणांना पोलीस आणि आरोग्य विभागाने शोधून रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील दोनजण करोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाले असून त्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

दिल्लीहून आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन पोलीस आणि महानगर पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठवण्यात आले असून  त्यातील सहाजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर दोनजणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. या दोन्ही व्यक्तींचा अहवाल गुरुवारी दुपारी आला होता. दरम्यान, त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघे राहात असलेला परिसर तातडीने सील केला आहे. अशी माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी लोकसत्ता ऑनलाईनला दिली आहे. अद्याप आणखी अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे करोना बधितांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.