News Flash

वाघोलीत चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

सुरक्षारक्षकांचे मोबाईल, बंदूक घेऊन चोरटे पसार

  • सुरक्षारक्षकांचे मोबाईल, बंदूक घेऊन चोरटे पसार
  • गोदामात सॅमसंग कंपनीचे मोबाईल

वाघोलीतील गोदामावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरटय़ांना प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर गोळीबार करण्यात आला. चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी (१३ नोव्हेंबर) मध्यरात्री घडली. सुरक्षारक्षकाकडील मोबाईल आणि बंदूक घेऊन चोरटे पसार झाले. गोदामात सॅमसंग कंपनीचे मोबाईल संच ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिवाजी सदाशिव काजळे (वय २७, रा. खांदवेनगर, वाघोली) असे चोरटय़ांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. सुरक्षारक्षक लोकेश रामेश्वर बोरो (वय २७, सध्या रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ रा. आसाम) याने या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील वाघोली येथे स्टोअर वेल वेअर हाऊस गोदाम आहे. गोदामात सॅमसंग कंपनीचे मोबाईल ठेवण्यात आले आहेत. बोरो, काजळे यांच्यासह दहा सुरक्षारक्षक तेथील गोदामाची सुरक्षाव्यवस्था पाहतात. ओमल्टी सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेसकडून गोदामाची सुरक्षाव्यवस्था पाहिली जाते.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास दोन चोरटे गोदामाच्या परिसरात आले. जवळपास उपाहारगृह आहे का, अशी विचारणा त्यांनी सुरक्षारक्षक जंकी पांडे, बोरो, काजळे यांच्याकडे केली. त्यानंतर चोरटय़ांना बोरोने जवळ असलेल्या उपाहारगृहाचा पत्ता दिला. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास पुन्हा चोरटे तेथे आले. हिंदी भाषेत बोलणाऱ्या चोरटय़ांनी उपाहारगृहात चांगले जेवण मिळल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरटय़ांनी वाढदिवस असल्याचे सांगून पांडे, काजळे, बोरो यांना पेढे खाण्यासाठी दिले. पेढय़ात गुंगीचे औषध टाकले होते. पेढे खाल्यानंतर सुरक्षारक्षकांना झोप आली. काही वेळानंतर तेथे चोरटे आणि त्यांचे साथीदार आले. त्यांनी सुरक्षारक्षक काजळेशी झटापट सुरू केली. पांडेने तातडीने या घटनेची माहिती बोरोला दिली. बोरो मनोऱ्यावरून खाली आले. तेव्हा चोरटय़ांनी काजळेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तसेच त्याच्यावर गोळीबार केला. गुंगीत असलेल्या बोरोला नेमके काय झाले, याची कल्पना नव्हती.

बोरोने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे गोदामाच्या सीमाभिंतीवरून उडी मारून पसार झाले. चोरटे बोरोचा मोबाईल आणि काजळेची बंदूक घेऊन पसार झाले. बोरोने तातडीने सुरक्षाव्यवस्था पुरवणाऱ्या कंपनीचे अधिकारी अविनाश चांदणेंना ही माहिती दिली.

गंभीर जखमी झालेल्या काजळेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पक्कड, कटावणी आणि काडतुसे सापडली. लोणीकंद पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:15 am

Web Title: security guard death in firing
Next Stories
1 नववीत अडीच लाख मुले अनुत्तीर्ण
2 पीएच.डीच्या ‘त्या’ केंद्राची मान्यता धोक्यात?
3 बीएसएनएलची सेवा विस्कळीत; मोबाइलधारकांना मनस्ताप
Just Now!
X