शिवसेनेशी चर्चा करून वाद सोडविण्याचा सल्ला
स्वतंत्र लढल्यास अधिक जागा निवडून येतात. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा आदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सातत्याने कार्यकर्त्यांना देत असले, तरी त्यांच्या या भूमिकेला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी प्रदेश बैठकीतच खोडा घातला. घरातील दोन भावांमध्ये भांडणे, कुरबुरी होत असतात. मात्र, त्याची जाहीर लक्तरे मांडण्यापेक्षा शिवसेना आणि भाजप यांनी चर्चा करून वाद सोडवावेत, असा सल्ला देतानाच नायडू यांनी शिवसेना हा आपला जुना मित्र पक्ष असल्याची स्पष्ट जाणीव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, श्याम जाजू, प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्री व्यासपीठावर होते.
चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी महापालिका निवडणूक होणार असल्यामुळे त्याचा अधिकाधिक फायदा कोणाला होणार आणि शिवसेना-भाजप युती होणार का याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. स्वबळावर लढलो तर जागा वाढतात आणि पक्षाची ताकद वाढते या सूत्रावर नाशिक येथील बैठक झाली होती. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, असा आदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले होते. त्यामुळे शिवसेनेबरोबर युती होणार नाही अशी शक्यता व्यक्त होत असताना प्रदेश बैठकीमध्ये दानवे यांच्या भूमिकेला नायडू यांनी खोडा घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशाच्या विकास दरामध्ये झपाटय़ाने वाढ होत असून जगामध्ये भारताची मान उंचावली आहे, असे सांगून नायडू म्हणाले, मागील सरकारने केवळ घोषणा दिल्या.
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रकुल स्पर्धा, भूगर्भातील कोळसा खाणींचा घोटाळा, सागरी पाणबुडय़ांच्या खरेदीमधील आणि आकाशातील ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचार असे सर्वच क्षेत्रामध्ये घोटाळे केले. काँग्रेस हे बुडते जहाज असल्यामुळे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप सत्तेवर येईल.
राज्यामध्ये फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राने चार हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. मात्र, काही शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे दुर्दैवी आहे.

आमची झाली, आता तुमची निवडणूक
लोकसभा आणि विधानसभा ही आमची निवडणूक झाली. आता महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक तुमची आहे. आम्ही विजयी होण्यासाठी तुम्ही काम केलेत. आमच्यासाठी केलेत त्याच्या दुप्पट काम आता तुम्हाला करावे लागेल, असे रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. संसद ते पंचायत हे मोदीजींचे स्वप्न साकारण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्यासपीठावर खडसेंना विशेष स्थान
आरोपांमुळे राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये खडसे यांची खुर्ची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पक्षाचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे’ असा त्यांचा गौरव केला. पुणेरी पगडी परिधान करून खडसे यांचा सत्कार करण्यात आला आला तेव्हा पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.