पुणे : अिजठा लेण्यांसंदर्भात संशोधन करून लेखनाद्वारे भारतीय कला आणि वास्तुशिल्पकलेतील अजोड कलाकृती असलेल्या अजिंठा लेण्याची जगभराला ओळख करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक (वय ९१) यांचे अमेरिकेमध्ये नुकतेच निधन झाले.

वॉल्टर स्पिंक यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. हॉर्वर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर स्पिंक १९५४ मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आले. अजिंठा लेण्यांची भुरळ पडलेल्या वॉल्टर यांनी या लेण्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन केले. ऐतिहासिक साधने आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे कला आणि वास्तुशिल्पकला या विषयांमध्ये अिजठा लेण्यांचे योगदान या संबंधी ‘अिजठा : हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट’ या ग्रंथाच्या सात खंडांचे लेखन त्यांनी केले होते. या वयातही आठव्या खंडाच्या लेखनाचे काम करण्यामध्ये स्पिंक व्यग्र होते. त्यांच्या या खंडांचा मराठी आणि हिंदूी अनुवाद करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे वॉल्टर स्पिंक यांच्या अजिंठा लेण्यांच्या आकलनावर आयआयटी पवईतर्फे पाच लघुपटांच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाकाटक राजवटीत अजिंठा लेणी ही सम्राट हरीसेन यांच्या कालखंडात साकारली गेली आहे, असे सांगणाऱ्या स्पिंक यांनी अवघ्या १८ वर्षांमध्ये ही लेणी घडविली असल्याचा सिद्धांत मांडला होता. वाकाटक राजवटीचा उत्कर्ष आणि ऱ्हास कसा झाला याची वस्तुनिष्ठ मांडणी त्यांनी केली होती. ‘अिजठा : द एण्ड ऑफ द गोल्डन एज’, ‘अजिंठा : ए ब्रिफ हिस्ट्री अँड गाईड’ आणि ‘कृष्णा : डिव्हाईन लव्हर’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. आपल्या संग्रहातील वस्तू आणि मूर्ती त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स आणि बनारस संग्रहालय येथे दिल्या होत्या. गेल्या ३५ वर्षांपासून ते दरवर्षी पावसाळ्यात आणि जानेवारीमध्ये अिजठय़ाजवळील फर्दापूर गावामध्ये वास्तव्य करीत असत. या गावातील नागरिकांमध्ये ते सामान्य व्यक्तीप्रमाणे मिसळून जात, अशी माहिती अभ्यासक सायली पलांडे-दातार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.