शरद पवार, कामगार मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही तिढा कायम

‘टाटा मोटर्स’चे कामगार, कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापनात वेतनवाढ करारासह अन्य मागण्यांवरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यासाठी कामगार संघटनेने टाटा परिवाराचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मध्यस्थी घातले. पवारांनी कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याशी चर्चाही केली. त्यामुळे काहीतरी तोडगा निघेल, असे सर्वानाच वाटले. प्रत्यक्षात काहीच न घडल्यामुळे पवारांच्या या शिष्टाईचा काहीच उपयोग झालाच नाही, अशी भावना कामगारांमध्ये आहे. त्याचप्रमाणे, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या उपस्थितीत झालेली ‘सकारात्मक’ चर्चाही फळाला आली नसल्याचे चित्र आहे.

टाटा मोटर्समध्ये कामगार व व्यवस्थापनात गेल्या दोन महिन्यांपासून तणाव आहे. एक सप्टेंबर २०१५ पासून वेनतवाढ करार लागू करण्याची व कराराचा कालावधी तीन वर्षांचा असावा, अशी कामगार संघटनेची आग्रही मागणी आहे. दर दोन महिन्यानंतर मिळणारा महागाई भत्ता प्रत्येक महिन्यानंतर देण्यात यावा, सेवानिवृत्तीचे सध्याचे वय ६० वर्षेच ठेवावे आणि कामगारांच्या अन्य मागण्यांविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे कामगारांचे म्हणणे आहे.

यातील काही मागण्यांच्या दृष्टीने व्यवस्थापनाकडून सकारात्मकता दाखवली जाते. त्या दृष्टीने ठोस असा निर्णय मात्र होत नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे.

कामगारांच्या पदरात काहीच नाही

कंपनीतील कामगार व व्यवस्थापनात सलोख्याचे संबंध असल्याचे निदर्शनास आणून देत ही परंपरा मोडू नका आणि शहरातील औद्योगिक शांतता बिघडवू नका, असे आवाहन मंत्र्यांनी बैठकीत केले होते. बैठकीनंतर पुढे फार काही झाले नाही. कंपनीतील कामगारांच्या शिष्टमंडळाने कामगारमंत्र्यांची भेट घेतली, त्याच दिवशी मुंबईतच असलेल्या शरद पवार यांचीही भेट घेतली होती. कामगार प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पवारांनी सायरस मिस्त्री यांना दूरध्वनी केला होता. त्यांच्यातील चर्चेनंतर आपण या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालू आणि सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मिस्त्री यांनी पवारांना दिली होती. शरद पवार यांचा टाटा परिवाराशी असलेला स्नेह लक्षात घेता, काहीतरी तोडगा निश्चितपणे निघेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात कामगारांच्या पदरात काही पडले नाही.

ठोस निर्णय नाही

वेतनकराराचा कालावधी चार वर्षांचा राहील आणि प्रत्येक वर्षांसाठी २५ टक्के याप्रमाणे चार वर्षांत वेतनवाढ विभागून देण्यात येईल, यावर व्यवस्थापन ठाम आहे. एकमत होत नसलेल्या मुद्दय़ांवर चर्चेच्या फे ऱ्या सुरू आहेत. मात्र, दोहोंपैकी कोणी मागे येत नसल्याने संघर्ष कायम आहे. हा तिढा सुटावा, या दृष्टीने प्रयत्न म्हणून टाटा मोटर्सचे एक शिष्टमंडळ कामगारमंत्र्यांना भेटले होते. संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि त्यानुसार झालेल्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते. यावेळी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, मात्र, ठोस निर्णय झाला नाही.