ऋषिपंचमीनिमित्त सामाजिक, प्रकाशन, व्यवस्थापन, संगीत, चित्रकला, संशोधन, वैद्यकशास्त्र अशा विविध क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा शारदा ज्ञानपीठम् या संस्थेतर्फे मंगळवारी (१० सप्टेंबर) सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रकाशक दिवंगत ह. अ. भावे यांचा समावेश आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर चंचला कोद्रे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित राहणार असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, असे संस्थेचे पं. वसंत गाडगीळ यांनी कळविले आहे.
सत्कारार्थीचा परिचय असा-

ह. अ. भावे (मरणोत्तर) : सरकारी नोकरी सोडून अभियांत्रिकी वर्ग चालविणाऱ्या भावे यांनी चार दशके लेखन आणि प्रकाशन क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविले. ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांच्या साहित्याचे प्रकाशक ही त्यांची ओळख. त्यांनी दोनशेहून अधिक पुस्तकांचे लेखन केले.

दुर्गानंद गायतोंडे : ब्रिटिश कंपनी, एमएसईबी आणि अरिवद मफतलाल यांच्या नॅशनल ऑरगॅनिक केमिकल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक म्हणून कार्य. इंग्लिश आणि मराठीतून लेखन. कवडसे, पराधीन आहे पुत्र मानवाचा, आभास, तणावमुक्त जगा ही त्यांची पुस्तके प्रकाशित. वयाच्या ९५ व्या वर्षीही कार्यमग्न.

एस. रंगाचारी : श्रीरामाचारी रंगाचारी यांचा तामिळनाडू येथील खेडय़ात जन्म. १९७९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ‘सेंट क्रिसपिन्स होम’ या अनाथालयाच्या कामाला पूर्ण वेळ वाहून घेतले. गेली ७१ वर्षे अंत्यसंस्कार सेवा देण्याचे काम करणारे चारी मामा मद्रासी कुटुंबातील कुणाकडेही मृत्युसंकट ओढवले की तेथे मदतीला धावून जातात.

बाळासाहेब कुलकर्णी : धुळे जिल्ह्य़ातील कासारे (साक्री) येथील प्रभाकर चित्रमंदिराचा शुभारंभ ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटाने झाला. चित्रपटाचा चालता-बोलता इतिहास असलेल्या बाळासाहेबांचा चित्रपट वितरक संघातर्फे दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते.

डॉ. प्र. चिं. शेजवलकर : गेली सहा दशकांहून अधिक काळ विद्यापीठस्तरीय अध्यापन. व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ ही ख्याती. विविध शिक्षण संस्थांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक. प्रसाद या आध्यात्मिक मासिकामध्ये गेली ५० वर्षे लेखन. एमबीए झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना ४० वर्षांत उद्योगांमध्ये नोकरी मिळवून दिली.

कुसुम शेंडे : पालकांच्या आवडीमुळे दर्जेदार गायकांच्या मैफली ऐकल्या. पंडिता रोहिणी भाटे आणि पं. हजारीवाल यांच्याकडे कथकनृत्याचे शिक्षण. गानसरस्वती सरस्वती राणे यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम. विविध संगीत नाटकांतून भूमिका. बंदिशींची निर्मिती. पुत्र डॉ. संजीव, सावनी आणि बेला या नाती यांच्यामुळे तीन पिढय़ांचे शिष्यपरंपरेचे भाग्य.

डॉ. यू. म. पठाण : मराठी आणि हिंदी विषयामध्ये पीएच.डी. संपादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभागप्रमुख. संतसाहित्याचे, महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. बिर्ला फाउंडेशनची गौरववृत्ती, साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह पद्मश्रीचे मानकरी.

सुधाकर खासगीवाले : ज्येष्ठ कला दिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांचे शिष्य. कोळी समाजाचा विशेष अभ्यास. राज कपूर यांच्या आर. के. फिल्म्सचे कला दिग्दर्शक. खासगीवाले चित्रायन आणि श्रीपद्मा पब्लिसिटी या संस्थांचे संचालक, चित्रकलेसाठी उपयोगी स्केचिंग या पुस्तकाच्या विविध भाषांतून २० आवृत्त्या प्रकाशित. मेहेंदी लेखन, रांगोळी लेखन ही लोकप्रिय प्रकाशने.

प्रभाकर घारपुरे : रेल्वेमधून कार्यालय अधीक्षक म्हणून निवृत्त. दीनदयाळ शोध संस्थानतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ छंद प्रकारांचे दररोज दोन तासांचे सायंवर्ग. बालजगत संस्थेचे संस्थापक-सचिव. भारतातील परशुराम मंदिरांच्या ऐतिहासिक, प्राचीन स्थळांचा वेध घेण्यासाठी सर्वत्र प्रवास. श्रीपादराव चितळे यांच्या साहाय्याने ग्रंथलेखन.

डॉ. श्याम टिळक : भारतीय वायुजीवशास्त्राचे जनक. एअर सॅम्प्लर निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार. भोपाळ वायू गळती दुर्घटना समितीचे केंद्रीय निरीक्षक. कोथरूड कचरा डेपो हलविण्यात महत्त्वाचा वाटा. शिकागोच्या इलिन्राय विद्यापीठामध्ये निमंत्रित प्राध्यापक. आंतरराष्ट्रीय कवक शास्त्रज्ञ पुरस्कार.

डॉ. प्रभा अत्रे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका. ‘सरगम’ या शोधप्रबंधासाठी डॉक्टरेट. आकाशवाणीच्या माजी निर्मात्या. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विभागप्रमुख. पद्मश्री, पद्मविभूषण, कालिदास सन्मान, टागोर अकादमी रत्न आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरव. ‘स्वरमयी’ या ग्रंथाला राज्य सरकारचा पुरस्कार. वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यानंतरही सांगीतिक ज्ञानयज्ञ सुरूच.

डॉ. ह. वि. सरदेसाई : स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विषयामध्ये सुवर्णपदक. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे २६ वर्षे मानद प्राध्यापक. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे शिशुविहार, मॉडर्न स्पोर्ट्स क्लब, पुणे न्यूरॉलॉजिकल सोसायटी यांसह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, गरवारे महाविद्यालय, जहांगीर नर्सिग होम, महाराष्ट्र मेडिकल रिसर्च सोसायटी या संस्थांशी संबंधित.