कोण काकडे मला माहीत नाहीत..त्यांनी स्वत: विषयी बोललं असेल..त्यांचं डोकं तपासून पाहिलं पाहिजे अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा समाचार घेतला. ही युती आता तुटली नसून चार वर्षांपूर्वी भाजपनेच ती तोडली होती, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री हे अत्यंत संयमी, स्थितप्रज्ञ आणि प्रामाणिक नेते असल्याचे गौरवोद्गार काढत पाच वर्षे सरकार स्थिर राहील असे सूचक वक्तव्यही केले. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांचे ५ पेक्षा जास्त खासदार निवडून येणार नसल्याचे वक्तव्य संजय काकडे यांनी मंगळवारी केले होते.याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी काकडेंवर टीका केली. काकडे अशी तुलनाच कशी करतात. त्याचं डोकं तपासण्याची गरज असल्याचे सांगत चार वर्षांपूर्वीच भाजपने युती तोडली होती. मोदींची लाट असताना सुद्धा शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले. ते आता आम्ही स्वतंत्रपणे २०१९ च्या निवडणुकीत लढलो तर १५० उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

आम्ही २०१९ चे रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्राला आता अस्थिर करून नुकसान करायचे नाही. महाराष्ट्राचे आम्ही देणे लागतो. सत्ता हा आमचा हेतू नाही. महाराष्ट्र टिकला पाहिजे. तो अस्थिर झाला तर हे राज्य कोलमडून टाकण्यासाठी अनेक शक्ती या देशात कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नक्षलवादी आमचे मित्र असल्याचे म्हटले होते. यावर खरंतर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. तिकडे चंद्रकांत पाटील कर्नाटकात जातात, कानडीचे गोडवे गातात.. कर्नाटकात जन्म घ्यावासा वाटतो, अशावेळी मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून फडणवीसांनी आपले मत व्यक्त केलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर, सुलभा उबाळे,राहुल कलाटे आदी उपस्थित होते.