अप्पा बळवंत चौक गर्दीपासून दूर
पुणे : नव्या शैक्षणिक वर्षांची पुस्तके, वह्य़ा अशा शालेय साहित्य खरेदीला करोनाची बाधा झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळचा परिसर असल्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकाने बुधवारी उघडू शकली नाहीत. शालेय साहित्य खरेदीची बाजारपेठ हा लौकिक असलेला अप्पा बळवंत चौक बालक आणि पालकांच्या गर्दीपासून दूर राहिला आहे.
शालेय साहित्य खरेदीची बाजारपेठ असलेल्या अप्पा बळवंत चौक परिसरात शंभराहून अधिक दुकाने आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली ही दुकाने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात उघडतील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळचा परिसर असल्यामुळे पोलिसांनी तूर्त दुकाने उघडुू नयेत, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली.
शाळांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मे महिन्यापासूनच पुढील वर्षांची पुस्तके, वह्य़ा आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आप्पा बळवंत चौक परिसर गजबजलेला असतो.
शालेय तसेच महाविद्यालयीन पुस्तकांची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी पालकांसह येत असतात. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद आहे. आता महापालिका प्रशासनाने दुकाने उघडण्यासाठी मार्ग मोकळा केला असला तरी फरासखाना पोलीस ठाण्याचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशातून दुकाने उघडू नयेत, अशी सूचना पोलिसांनी केली आहे, अशी माहिती प्रगती बुक स्टॉलचे व्यवस्थापक दिनेश शहा यांनी दिली.
बाजारपेठेमध्ये शंभराहून अधिक दुकाने आहेत. त्यामुळे एका रांगेतील कोणती पाच दुकाने उघडायची याबाबत संभ्रम आहे, याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
जुन्या पुस्तकांच्या विक्रीला फटका
जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या पथारी व्यावसायिकांनाही करोनाचा फटका बसला आहे. नवीन पुस्तके विकत घेणे शक्य होत नाहीत असे ग्राहक जुन्या पुस्तकांची खरेदी करतात. शालेय पुस्तकांपासून ते अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अशा विविध विद्याशाखांच्या पुस्तकांची किमान २५ टक्के सवलतीमध्ये विक्री केली जाते. अप्पा बळवंत चौक परिसरात जुन्या पुस्तकांची विक्री करणारे ७० स्टॉल दोन महिन्यांपासून बंद असल्याने आमचे जगणे मुश्कील झाले आहे, अशी व्यथा धनंजय मरळ यांनी व्यक्त केली. बहुतांश शाळांमध्ये पुस्तके मोफत दिली जात असल्याचा फटका आधीच व्यवसायाला बसला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.