पुणे : तब्बल पन्नासहून अधिक दिवस बंद असलेली लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बुधवारपासून सुरू झाली. सोने-चांदीच्या दुकानांसह मौल्यवान धातू विक्रीबरोबरच कपडय़ांचीही दुकाने सुरु झाली असली तरी दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

करोना संसर्गामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या पन्नासहून अधिक दिवस लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बंद होती. टाळेबंदीच्या निर्णयात शिथिलता आणल्यानंतर शहरात विविध प्रकारच्या पाच बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतरही लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लक्ष्मी रस्त्यासह  बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, अप्पा बळवंत चौक परिसर, कु मठेकर रस्ता, एमजी रस्ता, कोंढवा रस्ता, एनआयबीएम रस्ता येथील अत्यावश्यक नसलेली कोणतीही दुकाने आणि सेवा सुरू ठेवण्यात आली नव्हती. बाजारपेठांचे प्रमुख रस्त्यांवरील दुकाने उघडण्यास मान्यता देण्याचे संकेत महापालिके ने दिले होते.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी दुकाने, व्यवसाय सुरु ठेवण्याच्या निर्णयांची व्याप्ती वाढविली. त्यानुसार या रस्त्यावरील दुकानेही सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि बुधवारी प्रत्यक्ष दुकाने सुरू झाली. लक्ष्मी रस्त्यावरील सोने-चांदी, मौल्यवान धातू विक्रीच्या दुकानांबरोबरच कापड, तयार कपडे विक्रीची दुकानेही उघडल्याचे बुधवारी दिसून आले. येत्या काही दिवसांत या रस्त्यावरील दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत होतील, अशी शक्यता आहे.