जयंत पाटील यांचे आवाहन

जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भाजप-शिवसेनेला मतदारांनी घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सोमवारी सांगवीत केले.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त सांगवी मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध घोषणांची चित्रफितीद्वारे पोलखोल करत पाटील म्हणाले, भाजप-शिवसेनेचे सत्तेचे पर्व संपले, ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत. साडेचार वर्षांच्या कालावधीत त्यांनी जनतेची निव्वळ फसवणूक केली. नितीन गडकरी यांच्या शब्दात सांगायचे तर, खोटी स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारच्या पिटाईची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत. ते संसदेत येत नाहीत. खासदारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत नाहीत. फक्त श्रीमंतांचे चोचले पुरवण्याचे काम त्यांनी केले. मोदींच्या आशीर्वादामुळेच बँकांना फसवून अनेकांनी परदेशात पोबारा केला.

आढळरावांमुळेच खेडचा विमानतळ झाला नाही-अजित पवार

खेड परिसरात नियोजित असलेला विमानतळ शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामुळेच होऊ शकला नाही आणि तो दुसरीकडे गेल्याचा आरोप अजित पवार यांनी सभेत केला. मोदी आणि फडणवीस सरकार दरिद्री असून अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. हिटलरशाही फार काळ टिकत नाही, असे ते मोदी यांना उद्देशून म्हणाले.

प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव

देशातील प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव आहे. ७० टक्के माध्यमे मोदींचे गुणगाण करण्यात शक्ती वाया घालवतात. एखाद्या पत्रकाराने न ऐकल्यास त्याला नोकरी सोडावी लागते. विरोधी बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना ब्लॅक आऊट केले जाते. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवणाऱ्या मोदींना लोकशाहीचा आदर राहिलेला नाही, असे जयंत पाटील म्हणाले.