आयटी हब असलेल्या हिंजवडी येथील ग्रामपंचायतीच्या निकालकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर, या ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला असुन, श्री म्हातोबा परिवर्तन पॅनलने यामध्ये विजय मिळवला आहे. त्यांचे एकूण १५ सदस्य निवडून आले असुन, त्यापैकी तीन जण बिनविरोध झाले आहेत. तर, श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे, यातील एक जागा बिनविरोध आहे.

हिंजवडी हे आयटी हब म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीला देखील विशेष महत्व आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीच्या सरपंचपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, एकूण १७ जागांपैकी चार सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उर्वरित १३ जागांसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान झाले होते त्यांचा आज निकाल लागला.

श्री म्हातोबा परिवर्तन पॅनल (राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना) यांनी एकूण १५ जागांवर आपले सदस्य निवडून आणले. यापैकी, तीनजण बिनविरोध झाले आहेत. तर, श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलला (राष्ट्रवादी, शिवसेना) केवळ दोन सदस्य निवडून आणता आले असून, यापैकी एकजण बिनविरोध झालेला आहे. त्यामुळे श्री म्हातोबा परिवर्तन पॅनलने विरोधकांना धूळ चारत ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व दर्शवलं आहे.