पुणे विभागात सर्वाधिक साडेसहा लाख वीजग्राहक ऑनलाइन

घरबसल्या कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा महावितरण कंपनीने उपलब्ध करून दिल्यानंतर सुरुवातीपासूनच पुणे शहर व जिल्हा ऑनलाइन वीजबिल भरण्यात आघाडीवर राहिला आहे. एका महिन्यात ऑनलाइन पद्धतीने वीजबिल जमा करण्याच्या रकमेचा तब्बल शंभर कोटींचा टप्पा आता शहर व जिल्ह्य़ातील ग्राहकांनी ओलांडला आहे. सद्यस्थितीत पुणे विभागात सर्वाधिक साडेसहा लाखांहून अधिक वीजग्राहक बिल भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा आवलंब करीत आहेत.

महावितरण कंपनीच्या http://www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वीजबिलासाठी मोबाइल अ‍ॅपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून सर्व लघुदाब वीजग्राहकांना त्यांची सध्याची व मागील वीजबिले पाहता येतात आणि या वीजबिलांचा भरणा करता येतो. त्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसह मोबाइल व्ॉलेट व कॅश कार्डचा पर्याय देण्यात आला आहे. ऑनलाइन व मोबाइल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध झाल्यापासूनच पुण्यातून त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. वीजबिल भरणा केंद्रांच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या कोणत्याही ठिकाणाहून वीजबिल जमा करण्याचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. ऑनलाइन वीजबिल भरणा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यामागे नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनचंटाईचाही काहीसा वाटा आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास डिसेंबर महिन्यामध्ये १३५ कोटी ६२ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाइन पद्धतीने भरणा झाला.

त्यातील तब्बल १०६ कोटी रुपये पुणे विभागातील वीजग्राहकांनी ऑनलाइन भरले आहेत. ही रक्कम पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. डिसेंबरमध्ये कोल्हापूर जिल्ह्य़ात ९ कोटी ३६ लाख, सांगली जिल्ह्य़ात ६ कोटी ६९ लाख, सातारा जिल्ह्य़ात ८ कोटी ४० लाख, तर सोलापूर जिल्ह्य़ात ६ कोटी १४ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याबाबत पुणे शहर व जिल्ह्य़ाने घेतलेली आघाडी अद्यापही कायम राहिली आहे. सद्यस्थितीत मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातूनही वीजबिल भरणा करण्याकडे कल दिसून येतो. सुलभ व सोप्या प्रक्रियेमुळे पुढील काळात ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तीन रुपयांची सूट मिळवा!

लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्यासह इ-मेलच्या माध्यमातून वीजबिल मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलाबाबत केवळ इ-मेलचा पर्याय स्वीकारल्यास ग्राहकाला दरमहा तीन रुपयांची सूट दिली जाते. इ-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपललब्ध आहे.