दस्त नोंदणीत घट बांधकाम क्षेत्रातील मंदीवर शिक्कामोर्तब

नव्या वर्षांत ‘रेडी रेकनर’चे दर वाढण्याची शक्यता असल्यास चालू वर्षअखेरीस जुन्या दराने सदनिकांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. गेल्या काही वर्षांपासूनचे हे चित्र यंदा मात्र पालटले आहे. जानेवारी, २०१६ पासून ‘रेडी रेकनर’चे दर वाढून घरे महाग होण्याचे संकेत आहेत. मात्र, असे असतानाही राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांत दस्त नोंदणीत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ३० हजारांनी दस्त नोंदणी कमी झाली आहे. डिसेंबरमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. सदनिकांच्या खरेदीत घट झाल्याने बांधकाम क्षेत्रातील मंदीवर शिक्कामोर्तब झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून राज्य सरकारला सुमारे २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. सरकारतर्फे दरवर्षी महसूलवाढीचे लक्ष्य निश्चित केले जात असते. त्यामुळे ‘रेडी रेकनर’चे दर वाढविण्याकडे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा कल असतो. त्यानुसार २०१६ मध्ये ‘रेडी रेकनर’मधील दरांमध्ये १० ते १५ टक्क्य़ांनी वाढीचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला आहे. पुढील वर्षी किमती वाढणार असल्यास चालू वर्षांच्या अखेरीस कमी किमतीमध्ये घरे घेण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे साधारणत: नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत मोठय़ा प्रमाणावर घरांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असतात. त्यामुळे साहजिकच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयामध्येही गर्दी वाढत असते. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र होते. यंदाच्या वर्षी मात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी घरांच्या किमती वाढणार असल्या तरी खरेदी-विक्री व्यवहार मोठय़ा प्रमाणावर घटले आहेत. मागील वर्षीही ‘रेडी रेकनर’च्या दरवाढीचे संकेत होते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात १ लाख ८० हजार ३४७ दस्तांची नोंदणी झाली होती, तर डिसेंबरमध्ये हा आकडा २ लाख २५ हजार १७६ वर गेला होता. सहायक नोंदणी महानिरीक्षक गोविंद गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी नोव्हेंबरच्या दस्त नोंदणीमध्ये मध्ये घट झाली असून, यंदा १ लाख ५२ हजार ४०५ दस्तांची नोंदणी झाली. नोव्हेंबरची आकडेवारी पाहता डिसेंबरमध्येही दस्त नोंदणी कमी होण्याची शक्यता आहे.

नागरिकांकडे पैसे नाहीत म्हणून घरांना मागणी कमी झालेली नाही. लोकांकडे पैसा आहे, मात्र तो वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवला जातो आहे. गुंतवणुकीचा कल काहीसा बदलला असल्याने हे चित्र निर्माण झाले आहे. जुन्या व बांधून पूर्ण झालेल्या प्रकल्पांना मागणी नसल्याने आता नवे प्रकल्प हाती घेण्यास बांधकाम व्यावसायिक धजावत नाहीत. मात्र, मंदीची ही स्थिती कायमची नाही. परिस्थिती नक्की बदलेल.
– बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

यंदाचा दस्त नोंदणीचा उतरता आलेख
महिना दस्तसंख्या महसूल (कोटीत)
जून २,०६,८६२ १६३४.४
जुलै १,९९,६७९ १८७३.११
ऑगस्ट १,७५,७८० १६७२.९६
सप्टेंबर १,६८,८७९ १६७९.१
ऑक्टोबर १,७१,५७५ १६०६.३४
नोव्हेंबर १,५२,४०५ १५३२.७९