“केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात लसीकरण केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद असून ज्यावेळी आम्हाला लस दिली जाईल, तेव्हा निश्चित घेतली जाईल. पण प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की मी लस घेणार नाही आणि आम्ही त्यांना अजिबात देणार नाही.” असं मिश्कील विधान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आज(रविवार) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केलं.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “ज्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात आली. तिथे दोन दिवसांपूर्वी आग लागली. त्या घटनेत जवळपास हजार कोटींचं नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीला केंद्र सरकारकडून कशा प्रकारे मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर त्या आगीच्या घटनेत निष्पाप पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कंपनीकडून २५ लाखांची मदत देखील जाहीर झाली आहे. पण आता कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना तिथे नोकरी द्यावी, अशी मागणी मी पूनावाला यांच्याकडे करणार आहे.”
तसेच, लसीला विरोध करणाऱ्यांनीच आग लावली आहे का? नेमकं काय झालेलं आहे? या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, मी घटनास्थळाकडे चालेलो आहे. असं देखील आठवले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
एल्गार परिषदेच्या व्यासपीठावर नक्षलवादी लोक असू नये –
पुण्यात ३० जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे, ही बाब ठीक आहे. पण त्यामध्ये कोणी नक्षलवादी लोक असू नये. तिथे आंबेडकर आणि गांधीवादी लोक व्यासपीठावर असावेत, असं मत रामदास आठवले यांनी पुण्यात होणार्या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 5:42 pm