माझ्या राजकीय जीवनात पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचे काम केले आहे. मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक किंवा दावेदार नव्हतो. मात्र, माझ्या कामाच्या जोरावर मला महत्वाची पदं मिळत गेली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास मी ती का सोडेन असे विधान महसूलमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मनसोक्त चर्चा केली.

ईव्हीएम विरोधात विरोधक मोर्चा काढणार आहेत त्यावर भूमिका स्पष्ट करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणूक कशी घ्यावी हे आंदोलनाने नव्हे तर निवडणूक आयोगाकडून ठरते. भाजपा मतपत्रिका किंवा ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास तयार आहे. कारण आमचा पक्ष सर्वसामन्यांच्या मनातला पक्ष असून काहीही झाले तरी आमचाच विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रीपदाची क्षमता आहे का? यावर ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे जनता ठरवेल.

भाजपामध्ये अजूनही मेगा भरती सुरु असल्याची चर्चा आहे. यावर पाटील म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आता भाजपा असून राज्यात देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आघाडीतील नेते मंडळी आमच्याकडे येत आहेत आणि अजून काँग्रेसमधील किमान १० जण येण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आघाडीतील नेत्यांना दबाव तंत्राचा वापर करुन भाजपात आणले जात आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे आणि गणेश नाईक यांना बाहेर आणले. तेव्हा त्यांनी ही कामगिरी कशी केली हे राज्यातील जनतेला माहितीच आहे, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

बाहेरचे आल्याने पक्षाचे स्वरुप बदलणार नाही : चंद्रकांत पाटील

मागील पाच वर्षांत एकमेव राधाकृष्ण विखे पाटील आमच्या पक्षात आले आहेत. त्यावरुन पक्षाच्या धोरणावर बोलले जात असले तरी बाहेरचे आल्याने पक्षाचे स्वरुप कदापी बदलणार नाही, अशी भुमिका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली. तीन पिढ्यांचा राजकारणाचा अनुभव लक्षात घेऊन विखे पाटील यांना पक्षात सामावून घेण्यात आले, पक्ष चालविण्यासाठी अशा अनुभवी लोकांची गरज असते असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.