‘समाजपरिवर्तन सरकारी आदेशाने नव्हे तर समाजाच्या सहभागातून होते. जेव्हा कायदा, सामाजिक चळवळ आणि समाज या तीन गोष्टी एकत्र येतात, तेव्हाच परिवर्तन यशस्वी होऊ शकते. पण त्यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. कार्यकर्तेपण हा कोणताही बदल घडण्यासाठीचा प्राण असतो,’ असे मत केंद्रीय पर्यवरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
दिवंगत सामाजिक कार्यकर्ते धनंजय थोरात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ यंदा जावडेकर यांच्या हस्ते गुन्हेगारांचे व त्यांच्या कुटुंबांचेही पुनर्वसन करणारे कार्यकर्ते उदय जगताप, ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ आणि दृष्टिहीन व एचआयव्हीबाधित मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देणारी नृत्यांगना सायली गुजर यांना प्रदान करण्यात आला. धनंजय थोरात यांच्या मातोश्री रमाबाई थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, आमदार मोहन जोशी, आमदार गिरीश बापट, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, पराग करंदीकर, उल्हास पवार, अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले,‘‘ ‘लष्करच्या भाक ऱ्या भाजणारे’ म्हणून कार्यकर्त्यांची संभावना केली जाते. पण हेच कार्यकर्तेपण बदल घडण्यासाठीचा प्राण असतो. प्रत्येक योजनेत जनतेला सहभागी करून घेण्याचे आमचे धोरण आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’सारखे अभियान कोणत्या एका पक्षाचे किंवा सरकारचे नव्हे तर जनतेचे असायला हवे. परिवर्तन यशस्वी होण्यासाठी कायदा, सामाजिक चळवळ आणि समाज एकत्र येणे गरजेचे असून त्यासाठी कुणाला तरी पुढाकार घ्यावाच लागतो.’’
शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन ही अधिक मोठी जबाबदारी असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘शिक्षा भोगून आलेल्यांना नोकरी न मिळाल्यास ते पुन्हा वाईट मार्गाकडे वळण्याची शक्यता असते. अशा २६ जणांचे आम्ही पुनर्वसन केले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत म्हणून अशा १९० कुटुंबांमधील मुलांसाठी शैक्षणिक योजनाही चालवली.’’
‘आपल्या पक्षाची ध्येयधोरणे माहिती असणारे आणि त्यातही स्वत:चे मत असलेले कार्यकर्ते तयार होवोत,’ असे पोळ यांनी सांगितले.