‘‘शेवटची फ्रेम समाधान देत नाही तोपर्यंत उत्तम काम करण्याचा माझा प्रयत्न असतो. ध्वनी हीच माझी भाषा आहे आणि या भाषेतूनच संवाद साधण्याची संधी मला महत्त्वाची वाटते..’’
 ही भावना आहे ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाचा ऑस्करविजेता ध्वनी अभियंता (साऊंड इंजिनिअर) रसूल पोकुट्टी याची. ‘ए रेनी डे’ या चित्रपटामध्ये रसूल याने अमृत प्रीतम दत्त याच्यासमवेत निर्मिती केलेल्या पावसाच्या शंभर ध्वनींची अनुभूती मराठी रसिकांना रजतपटावर पाहण्याची संधी लाभणार आहे.
राजेंद्र तालक क्रिएशन्स निर्मित ‘ए रेनी डे’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसूल पोकुट्टी याची कला मराठी चित्रपटसृष्टी प्रथमच अनुभवणार आहे. सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, अजिंक्य देव, हर्ष छाया, नेहा पेंडसे, सुलभा आर्या, संजय मोने, किरण करमरकर, प्रिन्स जेकब, शैला कामत आणि मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती दिग्दर्शक राजेंद्र तालक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कवी सौमित्र (किशोर कदम) याच्या दोन कवितांना अशोक पत्की यांनी स्वरसाज चढविला आहे.
‘ध्वनी हेच माझ्या चित्रपटाचे संगीत आहे आणि हे तुलाच करावयाचे आहे’, असा प्रस्ताव घेऊन तालक माझ्याकडे आले. माझ्यासाठी आव्हान असलेले हे काम करताना आनंद तर मिळालाच. पण, त्याचबरोबरीने हे काम करताना चित्रपटाच्या कथेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला याचा आनंद अधिक असल्याचे रसूलने सांगितले. या चित्रपटासाठी शंभराहून अधिक पर्जन्य ध्वनी निर्मितीचा प्रयत्न केला आहे. यातील काही ध्वनी नैसर्गिक आहेत तर, काही ध्वनिमुद्रित आहेत. चित्रपट मग तो हॉलिवूडचा असो, बॉलिवूडचा की प्रादेशिक यापेक्षाही त्याचा विषय आणि आशय हाच माझ्यासाठी महत्त्वाचा असतो, असेही तो म्हणाला. मराठी, बंगाली, असामी, मल्याळम असे प्रादेशिक भाषेतील चित्रपट हेच भारतीय चित्रपटांचे कणा आहेत, अशीच माझी भावना असल्याचे त्याने सांगितले.
 दोन तासांच्या या कथेतील संपूर्ण चित्रपटभर गोव्याचे सौंदर्य आणि पाऊस आहे. चित्रपटाला पाश्र्वसंगीत नाही. पावसाच्या ध्वनीचा वापर करण्यात आला आहे, असे सांगून राजेंद्र तालक म्हणाले, भाषेपेक्षाही भावनेला अधिक महत्त्व असल्यामुळे चित्रपट मराठी असला तरी त्याचे शीर्षक इंग्रजी आहे. भ्रष्टाचार हा विषय या कथेतून मांडला आहे. हा विषय लोकपालपेक्षाही स्ट्राँग आहे.
अशोक पत्की म्हणाले, यातील एक गाणे जयश्री शिवराम यांच्या स्वरात असून त्यासाठी स्पॅनिश गिटार हे एकमेव वाद्य वापरले आहे. तर, तबला, तानपुरा आणि सारंगी या तीन वाद्यांसह आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या आवाजामध्ये भैरवी ध्वनिमुद्रित केली आहे. चित्रपटाचा आशय ध्यानात घेता मोजक्या वाद्यांतून ही गीते रसिकांसमोर येणे महत्त्वाचे वाटले.
पुण्यानेच मला घडविले- रसूल
पदार्थविज्ञान विषयात पदवी संपादन केल्यावर सुपर कंडक्टर विषयामध्ये संशोधन करण्याचा विचार होता. मात्र, अचानक पुण्यामध्ये ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये (एफटीआयआय) प्रवेश घेतला. या तीन वर्षांतील वास्तव्यात पुण्याच्या संस्कृतीने मला घडविले. उस्ताद सईदुद्दीन डागर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलींसह सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला लावलेली हजेरी, पर्वती आणि हनुमान टेकडीवर दररोज पहाटे फिरायला जाणे यामुळेच माझी जडणघडण झाली. हे सारे मी आता ‘मिस’ करतो, असेही रसूल पोकुट्टी याने सांगितले.