दहावी, बारावीच्या परीक्षेचे दिवस.. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ताण, तसाच पालकांच्याही.. मुला-मुलींना घेऊन पालक परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचतात.. छोटय़ा छोटय़ा गोष्टींची काळजी घेतात.. पण गरीब विद्यार्थ्यांचे काय? परीक्षेला जाण्याची ना स्वतंत्र व्यवस्था, ना पालकांना सवड; बसने जावे तर नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दी.. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था पुण्यातील ‘जय जंगली महाराज प्रतिष्ठान’ने केली असून, नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
परीक्षेच्या वेळी पालक मुला-मुलींची बरीच काळजी घेतात. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा असेल तर मग विचारायलाच नको. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेणे, बैठक व्यवस्था माहिती करून घेण्यासाठी मदत करणे, पेपर सुरू होईपर्यंत सल्ला देणे, अशा अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र, आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातील मुलांना ही चैन नसते. त्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचणेही दुरापास्त असते. अशा विद्यार्थ्यांसाठी जय जंगली महाराज प्रतिष्ठानतर्फे शहाराच्या आठ ठिकाणांवरून विनामूल्य बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे आता शाळांचे अंतरही वाढले आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला उशीर लागतो. वाहतुकीच्या कोंडीमुळे त्यात भरच पडते. सकाळच्या वेळी बसला गर्दी असल्याने परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचणे हे मोठेच काम असते. काही विद्यार्थ्यांचा तर यात तासभर मोडतो. मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तो वेगळाच. हा विचार करून या प्रतिष्ठानने ही व्यवस्था केली आहे. विशेषत: चांदणी चौक, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता या भागात ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात इतरही नागरिकांनी आपली वाहने घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
‘परीक्षेसाठी विनामूल्य प्रवास’ असा फलक चिटकवलेली वाहने चांदणी चौक, बावधन, सुसगाव, सुतारवाडी, सुसरोड, सोमेश्वरवाडी, संजय गांधी वसाहत, पंचवटी एन.सी.एल या बसथांब्यांवर थांबवली जातात. ती सकाळी ९ वाजता तिथे थांबतात. एका थांब्यावर किमान दोन वाहनांची व्यवस्था आहे. प्रत्येकी एका गाडीतून ८ ते १० विद्यार्थ्यांना सोडले जाते.

‘‘मध्यमवर्गीय आणि श्रीमंत विद्यार्थी स्वत:च्या गाडीने किंवा रिक्षाने परीक्षेच्या केंद्रावर जातात. मात्र, वाडय़ा वस्तीवरच्या गरीब विद्यार्थ्यांना बसनेच जावे लागते. काही वेळा या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळेच प्रतिष्ठानतर्फे ‘परीक्षेसाठी विनामूल्य प्रवास’ असे पत्रक लावून शहरातल्या वाडय़ा-वस्तीवरच्या आठ ठिकाणी हा उपक्रम गेली ११ वर्ष राबवत आहोत. शहरातल्या गणेश मंडळ, सेवाभावी संस्थांनीही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी असे कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.’’
– सुहास निम्हण, जय जंगली महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष