करोनाच्या काळात लॉकडाउनमुळं राज्यातील अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अनेक कामगार अजूनही बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी सेवेसह स्थानिक सार्वजनिक वाहतूक आणि सर्व प्रकाराची दुकाने लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा १० ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

“लोकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला असताना आता एसटीमधील १० हजार कामगार काढले जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे, हे होता कामा नये. राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, करोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नुसत करोना-करोना म्हणता बसू नका, पूराच्या संबधित काय उपाय योजना केल्या आहेत ते सांगा,” असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले, “टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. त्यांची दुकानं उघडण्याची परवानगी देणार आहात की नाही ते स्पष्ट करा. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे. १० हजार लोकं एसटी महामंडळ कमी करणार असल्याची बातमी आली आहे. दोन महिने एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळ आम्ही शासनाला विचारतो की तुम्हाला जे काही कृती मानकं (एसओपी) तयार करायचे होते ते तयार करा. पण हे एसओपी तयार करुन एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर कधी धावतील त्याची तारीख सांगा. विविध महापालिकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधी सुरु करणार तेही सांगा. जर शासन हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ८० कोटी कुटुंबांना अन्न-धान्य देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, ते अद्याप मिळालेलं नाही. रेशन दुकानांवर नियमाप्रमाणं धान्य मिळत नव्हतं. मात्र, नियमबाह्य पद्धतीनं रेशन किती जणांना वाटलं ते सांगा, असा प्रश्नही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

उद्धव ठाकरेंनी लोकांचा नेता व्हावं

जातीचा मोठा नेता कोणीही होऊ शकतो, धर्माचा नेताही होऊ शकतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आता लोकांचा नेता होऊन दाखवावं, असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.