‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात भूमिका मांडेन- प्रकाश आंबेडकर

पुणे : राज्याच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला तर त्यामध्ये ताजेपणा येईल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मांडली. राज्याच्या राजकारणात शिळेपणा आला म्हणजे काय या विषयी ‘लोकसत्ता’च्या ऑनलाइन कार्यक्रमात नेमकी भूमिका सविस्तरपणे मांडणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आंबेडकर आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

‘लोकसत्ता’तर्फे महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेणारी ‘लोकसत्ता’तर्फे ‘दृष्टी आणि कोन’ ही प्रमुख नेत्यांचा सहभाग असलेली दूर-संवादमाला सोमवारपासून (३१ मे) सुरू होत आहे. या मालिकेमध्ये बुधवारी (२ जून) प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग आहे. खासदार संभाजीराजे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये शिळेपणा आला आहे, अशी टिप्पणी केली. शिळेपणा आला म्हणजे काय, असे विचारले असता यासंदर्भात ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात भूमिका  मांडणार आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.