पुणे : देशात सुरू असलेल्या लसीकरणाची परिणामकारकता पडताळणारा अभ्यास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि आयसरकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांकडे पाठवण्यात आला आहे.

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लशींचा परिणाम नेमका कसा होतो, तयार झालेली प्रतिपिंडे (अँटीबॉडी) किती काळ टिकतात, वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या आजारांच्या रुग्णांना लस दिल्यावर त्यांच्या शरीराकडून कसा प्रतिसाद मिळतो, अशा बाबींचा अभ्यास या प्रकल्पामध्ये करण्याचे नियोजन आहे.

आयसरचे प्राध्यापक एल. एस. शशिधर म्हणाले, अभ्यासाचा उद्देश कोणतीही लस चांगली किंवा वाईट हे ठरवणे नाही. त्यामुळे करोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या सर्व लशींची परिणामकारकता यात तपासली जाईल. विविध वयोगटातील, विविध लशी घेतलेल्या समूहांचा अभ्यास के ला जाईल. महामारीच्या काळात के लेल्या सिरो सर्वेक्षणात ज्यांना प्रत्यक्ष करोनाचा संसर्ग झाला नाही, अशा मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली. मात्र, ही प्रतिपिंडे किती काळ टिकतात याची कोणतीही शास्त्रोक्त माहिती सध्या उपलब्ध नाही. हा अभ्यास दीर्घकालीन असल्यामुळे लस घेतल्यानंतर निर्माण होणारी प्रतिपिंडे किती काळ टिकतात, त्याची माहितीही संकलित होण्यास मदत होईल, असेही शशिधर यांनी स्पष्ट के ले.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जनुकीय विविधता आहे. अनेक प्रकारच्या असंसर्गजन्य आजारांची पाश्र्वभूमी असलेली लोकसंख्या आहे. पोषणाच्या उपलब्धतेच्या बाबतीतही बराच फरक आहे. या सर्व प्रकारच्या लोकसंख्येमध्ये लशीचे परिणाम कसे होतात, याचा आढावा या अभ्यासात घेणे शक्य आहे. ज्या नागरिकांची निवड अभ्यासासाठी के ली जाईल त्यांच्या रोगप्रतिकारशक्तीचा लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस घेतल्यानंतर आणि  डोस पूर्ण झाल्यानंतर  अभ्यास केला जाईल. महामारी सुरू असेपर्यंतच हा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे, कारण हा विषाणू आणि त्याचे परिणाम याबाबत जगात अजूनही संशोधन सुरू आहे. भविष्यात साथरोगासारखी परिस्थिती उद्भवली असता ती कशी हाताळली जावी, यावर हा अभ्यास उपयुक्त ठरेल.