ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे मत

राष्ट्रवाद म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे, तर त्या भूमीवर वास्तव्य करणाऱ्या लोकांवर प्रेम करणे आणि त्यांचे हित साधणे हाच खरा राष्ट्रवाद आहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

संगीतज्ञ, धृपद गायक व उदारमतवादी कवी विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्यावरील ‘किताब-ए-नवरस’ हे मूळ पुस्तक दखनी उर्दू भाषेत आहे. त्याचा मराठी अनुवाद असलेल्या ‘किताब-ए-नवरस : भाषांतर व आकलन’ या डॉ. अरुण प्रभुणे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते झाले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषांतरकार डॉ. सय्यद याह्य नशीत, भाषाशास्त्राचे अभ्यासक महंमद आझम, मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक रूपेंद्र मोरे या वेळी उपस्थित होते.

रसाळ म्हणाले,‘दोन संस्कृतींचा संयोग साधत मराठी राजभाषा करणारा आदिलशाह हा पहिला सुलतान आहे. दखनी उर्दूमध्ये काव्यरचना करणारा हा कवी उपेक्षित राहिला. देशात सध्या असलेला तणाव नाहीसा करायचा असेल तर अशा स्वरूपाची पुस्तके आली पाहिजेत.’

मोरे म्हणाले,की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा पहिला ‘किताब-ए-नवरस’आहे. ‘भरवी नवरसांचा सागरू’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. या देशावर राज्य करणारे सगळेच मुस्लीम वाईट नव्हते. औरंगजेब हा नियम नाही, तर अपवाद आहे.

नशीत म्हणाले,की मराठी संतकवी, सुफी कवी आणि उर्दूतील संतकवी, सुफी कवी यांचा अभ्यास करण्याचा आनंद अनुवादाच्यानिमित्ताने लुटला. दोन संस्कृतींचा मिलाफ करण्याचे काम साहित्य करू शकते याची जाण आली.

प्रभुणे म्हणाले,की  दररोज तीन तास १८ दिवस नशीत यांनी मला दूरध्वनीवरून सांगितले आणि मी ते संगणकावर टाईप केले. या अनुवादासाठी हैदराबाद येथील  सलारजंग म्युझियम येथून मूळ ग्रंथाची फोटोकॉपी करण्याची परवानगी महत्प्रयासाने मिळवली. नशीत यांच्यासारखे निष्ठावान संशोधक लाभले म्हणून हे पुस्तक साकारले गेले.

मराठी ही दखनीची माय

मराठी ही दखनी उर्दू भाषेची माय आहे, असे सांगून आझम म्हणाले,की दखनी भाषा मुख्यत: अरबी लिपीतून अवतरत असली तरी दखनी भाषेतील ९० टक्के शब्द मराठी आहेत. या भाषेत मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि क्रियापदेही आहेत. त्यामुळेच उर्दूचे अभ्यासक दखनी वाचताना हतबल होतात. उर्दू भाषाभ्यासक कूपमंडूक असल्याने ते अन्य भाषांचा तौलनिक अभ्यास करत नाहीत. ही टीका नव्हे तर वास्तव आहे.