गोदामात साखर मुबलक प्रमाणावर उपलब्ध असली, तरी करोनामुळे दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध आणण्यात आल्याने बाजारात साखरटंचाई निर्माण झाली आहे. पोलिसांच्या आदेशानंतर कामगार तसेच हमाल वर्ग बाजारात काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांना त्यांचे व्यवहार सुरू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बाजारात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा बाजारात साखर मुबलक उपलब्ध आहे. मात्र, करोनामुळे संचारबंदी तसेच दैनंदिन व्यवहारावरील निर्बंधाचे आदेश देण्यात आल्यानंतर बाजारात सध्या कामगार तसेच हमाल वर्ग कामावर येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांना दुकानदेखील उघडता येत नाही. त्यामुळे बाजारात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किरकोळ व्यापारी जरी खरेदीसाठी आले तरी त्यांना विक्री कशी करायची तसेच वाहतुकीचादेखील प्रश्न आहे, असे भवानी पेठ भुसार बाजारातील साखरेचे व्यापारी विजय गुजराथी यांनी नमूद केले.
पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येत आहे. बाजारात काम करणारे व्यापारी, हमाल, कामगार वर्गाला पेट्रोल उपलब्ध न झाल्यास व्यापारावरदेखील परिणाम होणार आहे. दुकानापर्यंत पोहोचायचे कसे तसेच पोलिसांकडून अडवणूक झाल्यास काय, हेदेखील प्रश्न आहेत, असे त्यांनी सांगितले.
बाजार आवारातील घटकांना ओळखपत्र देण्याची गरज आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजाराचे कामकाज गुरुवारपासून सुरू झाले आहे. साखरेची टंचाई नाही. सध्या बाजारातील व्यवहार सुरळीत कसे पार पडतील, यासाठी प्रशासनाने विविध पातळ्यांवर उपाययोजना करायला हव्यात.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना र्मचट्स चेंबर
केंद्र सरकारने मार्च महिन्यात २१ लाख टन साखरेचा कोटा उपलब्ध करून दिला होता. एप्रिल महिन्यासाठी १८ लाख टनांचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. बाजारात साखरेची अजिबात टंचाई नाही. मात्र, व्यवहारांवर मर्यादा आली आहे.
– विजय गुजराथी, साखर व्यापारी