पुणे : करोनाचे बाधित सर्वाधिक रुग्ण ज्या भागात आहेत, त्या भागातील (हाय रिस्क एरिया) प्रत्येक घराचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली असून २२५ पथकांकडून हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ प्रभागांमध्ये ४८ हजार ८४८ घरांना भेटी दिल्या असून एक लाख ६८ हजार ६० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी ११७ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

शहराच्या काही भागात एकाच ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोंढवा, गुलटेकडी, महर्षिनगर, नाना पेठ, भवानी पेठ, मंगळवार पेठ, टिंबर मार्केट, कासेवाडी, डायस प्लॉट, पुणे रेल्वे स्थानक परिसर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पर्यंतच्या परिसरात टाळेबंदी करण्यात आली असून पोलिसांकडून कडक निर्बंधही (कर्फ्यू) लादण्यात आले आहेत. या भागात सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास आणि घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही या भागात संशयित रुग्ण असण्याची शक्यता असल्याने महापालिकेने संबंधित भागातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र पद्धतीने २२५ पथकांची नियुक्ती केली असून त्यामध्ये महापालिका शाळांतील शिक्षक, आशा सेविका, परिचारिका, समूह संघटिका यांचा समावेश आहे. या पथकाकडून संबंधित परिसरातील नागरिकांच्या आजाराची माहिती घेतली जात आहे. संशयित रुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. सर्दी, खोकला, पडसे, ताप, कफ अशी लक्षणे आढळणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३९, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४९, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी ४०, वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १४, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २१, टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून २५ पथके केली आहेत. या व्यतिरिक्त आसपासच्या भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी २१ पथके करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.