स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी होणार किंवा नाही, याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत या संदर्भात भाष्य केले. त्यानुसार सदाभाऊ खोत यांच्याविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी स्वाभिमानीकडून चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांना या समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ही समिती सदाभाऊ खोत यांच्या भवितव्याचा फैसला करेल. यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एक भूमिका मांडतात आणि सरकारमध्ये असलेले सदाभाऊ दुसरी भूमिका मांडतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या मुद्द्यावरून आपल्याकडे सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध अनेकांनी तक्रार केली आहे. त्यामुळेच आम्ही ही समिती नेमण्याचा निर्णय घेतला. ही समिती सदाभाऊ खोत यांच्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. पक्षाच्या कार्यकारिणीने समितीला याबाबतचे सर्व अधिकार दिले आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तसेच स्वाभिमानी पक्ष सरकारमध्ये राहणार किंवा नाही, याबाबतची भूमिका २५ जुलैनंतर स्पष्ट करू असेही शेट्टी यांनी सांगितले. याशिवाय, स्वाभिमानीचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देऊ नये, अशी सूचना पक्षाकडून करण्यात आली होती.

वडिलांच्या उपचारांसाठी राजू शेट्टींकडून घेतलेले पैसे सदाभाऊंनी केले परत

दरम्यान, कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी ६ जुलैपासून देशव्यापी किसान मुक्ती यात्रा काढणार असल्याचे सांगितले. मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून या यात्रेची सुरूवात होईल. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी  शेतकरी चळवळीची व्याप्ती वाढवणाऱ्या राजू शेट्टींचे कौतुक केले होते. पाटण्यामध्ये राजू शेट्टी आणि नितीशकुमार यांच्यात बैठक झाली होती. देशभरात सुरु असलेल्या राष्ट्रीय किसान यात्रेत नितीशकुमार यांनी सहभागी व्हावे यासाठी राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली होती.

सत्तेतून बाहेर पडण्याचे राजू शेट्टींचे संकेत