स्वच्छता आणि आरोग्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे आपले घर प्रत्येक जणच स्वच्छ ठेवतो. मात्र आपापल्या घरातून बाहेर पडले की रस्त्यांवर कचरा टाकण्यापासून थुंकण्यापर्यंत अस्वच्छता निर्माण करण्याचे काम अगदी सहजतेने होते. आम्ही कर भरतो हा वृथा अभिमान देखील दाखवला जातो. त्याबरोबरच परदेशातील स्वच्छतेचे मात्र मनोसोक्त गुणगान केले जाते. या सगळ्या अस्वच्छता अभियानात ना वयाचा संबंध येतो, ना आर्थिक स्तराचा. प्रवास असो वा मनोरंजन स्थळ असो सार्वजनिक बागा असोत चित्रपटगृह, नाटय़गृह असो. सगळीकडेच प्रत्येक जण आपल्या जबाबदारीचे भान न मानता अस्वच्छता करण्यात तत्पर असतो. प्रसारमाध्यमातून स्वच्छता अभियानाबाबत जागरूकता निर्माण केली जाते, त्या वेळी हे काम शासनाचेच आहे, हा भाव देखील सहजतेने अनेकांच्या मनात येतो. पण असे असताना देखील स्वच्छता राखणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे भान बाळगत अनेक मंडळी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यात पुढाकार घेतात, तशीच काही मंडळी आपल्यामुळे होणारा कचरा रस्त्यावर कोठेही पडणार नाही, याची काळजी देखील घेतात. तर काही जण आपल्या गावाचा, शहराचा आणि पर्यायाने देशाचा विकास व्हावा, स्वच्छता अभियानात आपलेही काही योगदान असावे या जाणिवेतून कार्यरत होतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे माने उद्योग समूहाचे अध्यक्ष रामदास माने.

पाच कारखाने सांभाळत असताना, आपल्या उद्योगाच्याच माध्यमातून सामाजिक कार्याची प्रेरणा घेत रामदास माने यांनी थर्माकोलची तयार शौचालये तयार केली, ती आपल्या गावासाठी. सातारा जिल्ह्य़ातील लोधवडे या गावातून शहरात आलेल्या माने यांना आपल्या गावासाठी काही कार्य करण्याची संधी मिळाली, त्याचे त्यांनी सोने केले.

bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला २००६ मध्ये सुरुवात झाली, जे गाव स्वच्छ असेल, जेथे शौचालये असतील अशा गावांची पाहणी करीत पहिल्या आलेल्या गावाला २५ लाखांच्या बक्षिसाची घोषणा झाली आणि खटाव तालुक्यातील गावाचा पहिला क्रमांक आला. हे बघून सातारा जिल्ह्य़ातीलच लोधवडे गावाने देखील हे बक्षीस मिळविण्यासाठी चंग बांधला. सव्वा वर्ष राबून या गावात शौचालये बांधली गेली. प्रत्यक्ष पाहणीसाठी पथक येणापूर्वी लक्षात आले की या शौचालयांमध्ये आवश्यकतेनुसार दोन शौचालये कमी आहेत. विटा, वाळू, शौचालयाचे भांडे, दरवाजे, सिमेंट, कडी-कोयंडा हे सगळे साहित्य विविध ठिकाणांहून विकत आणत असतानाच गवंडी उपलब्ध करणे या सगळ्यांपेक्षाही अधिक जिकिरीचे काम होते. पाहणी पथक आठ दिवसांत गावात येणार होते आणि आठच दिवसांमध्ये दोन शौचालये उभी करायची होती. त्यासाठी पुरेसा निधी देखील नव्हता. या सगळ्यात रामदास माने यांच्याकडे ग्रामस्थांनी, तेथील पुढाऱ्यांनी गळ घातली आणि काहीतरी उपाययोजना करण्यास सांगितले. ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या गावाने आपल्याला वाढवले, त्या गावासाठी, तेथील मातीसाठी काही करणे आवश्यक होते. या गावाला बक्षिसाच्या वाटेवर नेण्यासाठी आता रामदास माने हेच काहीतरी करतील असा गावकऱ्यांचा विश्वास सार्थकी लावण्याची गरज होती. थर्माकोल बनविण्याचा उद्योग असलेल्या माने यांनी देखील गावासाठी काही केले पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगली आणि एका रात्रीत थर्माकोलपासून शौचालय तयार करण्यासाठीचे ‘डिझाइन’ तयार केले. पुढील दोन दिवसांमध्ये ही कल्पना प्रत्यक्षात आणत आपल्या गावाला २५ लाखांचे बक्षीस मिळवून दिले. इतकेच नाही, तर गाव स्वच्छ ठेवण्याच्या कामासही हातभार लावला.

थर्माकोलच्या शौचालयांची कल्पना वास्तवात आल्यानंतर रामदास माने यांनी मागे वळून बघितले नाही. उद्योजकतेला त्याला सामाजिकतेची जोड देत आपल्या कल्पनाशक्तीला भरारी दिली. केंद्र सरकारच्या ग्रामस्वच्छता अभियानासाठी व निर्मल ग्राम योजनेसाठी तसेच ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ आणि ‘स्वच्छ भारत अभियानासाठी’ ग्रामीण भागात ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर ४२५ खेडेगावांमधून २० हजार शौचालये त्यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिसा राज्यांमध्येही शौचालये पाठवली.

थर्माकोलच्या मशिनसाठी लागणारे कंट्रोल पॅनेल बनविणाऱ्या माने यांनी थर्माकोल बनविण्याचे ४५ देशांमध्ये ३५२ प्रकल्प प्रकल्प उभे करून दिले आहेत. त्यांचा इंदापूर येथे नवीन कारखाना उभा राहत असून  तेथे दर वर्षी ३० हजार शौचालये तयार होतील.

आर्थिक मदतीबरोबच श्रमांचे मोल जाणणाऱ्या माने यांनी आपल्या गावासाठी दुष्काळी कामे केली होती, तेथून सुरू झालेला त्यांचा उद्योजकापर्यंतचा प्रवास रोमंचकारी आहे. खिशात पैसे खुळखुळल्यानंतरही त्यांनी ग्रामीण भागाबरोबर असलेली आपली नाळ तुटू दिली नाही.

शौचालयांचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून वारीच्या माध्यमातून आठ वर्षांहून अधिक काळ वारीबरोबर दोन शौचालये पाठविण्यापासून नववधूंना लग्नातील अहेर म्हणून शौचालय देण्यातून माने यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मागील पावणेदोन वर्षांमध्ये त्यांनी गरजवंत असलेल्या २५ नववधूंना अहेरात शौचालये दिली आहेत. सुमारे पंधरा हजारांच्या आसपास किंमत असलेल्या या शौचालयांचे दान म्हणजे स्वच्छतेकडे उचललेल्या अनेक पावलांपैकी एक महत्त्वाचे आणि मोलाचे पाऊल आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

– श्रीराम ओक

shriram.oak@expressindia.com