News Flash

ट्रेंड स्वेटर्स, हुडीजचा.. मात्र कुत्र्यांसाठी!

आपल्या मालकांबरोबर मजेत फिरणाऱ्या कुत्र्यांच्या अंगातील रंगाबेरंगी स्वेटर्स लक्ष वधून घेत आहेत.

थंडीसाठीच्या उत्पादनांनी भरलेल्या बाजारपेठेत सध्या ‘आय लव्ह पुणे’, ‘बाप 9kutra1बाप होता है’, ‘नो पंगा’ अशा मजकुराच्या हूडीज, हाडे, पावलांचे ठसे अशा छपाईचे स्वेटर्स, रंगीबेरंगी जर्किन्स, डेनिम जॅकेट्स, शूज अशी उत्पादने दिसत आहेत. मात्र ही सगळी उत्पादने आहेत.. पाळीव श्वानांसाठी!
सकाळच्या गुलाबी थंडीत बागा, जॉगिंग ट्रॅक्स, टेकडय़ा, विद्यापीठ, ठरावीक रस्ते यांठिकाणी चालायला जाणारे पुणेकर.. बहुतेकांच्या एका हातात पाळीव कुत्रे आणि दुसऱ्या हातात एखादी छडी. हे दृश्य नवीन नसले तरी त्यात आता थोडा बदल झाला आहे. आपल्या मालकांबरोबर मजेत फिरणाऱ्या कुत्र्यांच्या अंगातील रंगाबेरंगी स्वेटर्स लक्ष वधून घेत आहेत. गेल्या काही वर्षांत पाळीव प्राणी आणि विशेषत: परदेशी जातींची कुत्री पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. प्राणीप्रेमींची हौस हेरून नव्या संकल्पना, उत्पादने न आणेल ती बाजारपेठ कसली! किंबहुना सातत्याने आणि बदलत्या परिस्थितीनुसार प्राण्यांसाठीची नवी उत्पादने बाजारात येत आहेत. सध्या प्रिंटेड स्वेटर्सबरोबरच ट्रेंड आहे तो कुत्र्यांसाठीच्या हुडीज आणि जर्किन्सचा. थंडी थोडीशी कमी झाली असली तरीही स्वत:बरोबरच घरातील पाळीव प्राण्यासाठीही स्वेटर्सची खरेदी होत आहे.
पाळीव प्राण्यांसाठीचे साहित्य विकणारी शंभरहून अधिक दुकाने पुण्यात आहेत. ती सध्या थंडीसाठीच्या उत्पादनांनी भरून गेली आहेत. ‘पोझोन्स’, ‘हेड्स अप फॉर टेंड्स’, ‘मार्शल पेट झोन’ या ब्रँड्सचे कपडे उपलब्ध आहेत. अमेरिका, इटली या देशांतील कंपन्यांबरोबर चिनी कंपन्यांची उत्पादनेही बाजारात आहेत. कुत्र्याच्या आकारमानाप्रमाणे त्याच्या कपडय़ांची किंमत आहे. साधारण अडीचशे रुपयांपासून ते अगदी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत स्वेटर्स उपलब्ध आहेत. हुडीज हे साधारण सहाशे रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. जॅकेट्स हा तुलनेने स्वस्त पर्याय आहे. दीडशे रुपयांपासून जॅकेट्स उपलब्ध आहेत.
याबाबत एंजल्स झोन या दुकानाचे विक्रेते विकास माने यांनी सांगितले,‘ ‘थंडीच्या दिवसांत कुत्र्यांना फिरायला नेताना स्वेटर्स किंवा जॅकेट घालण्याचा सल्ला पशुवैद्यांकडूनच दिला जातो. त्यामुळे स्वेटर्स, हूडीजची मागणी वाढली आहे. कुत्र्याचे अगदी पायापर्यंत अंग झाकले जाईल अशा हूडीजना अधिक पसंती मिळत आहे. मांजर, हॅमस्टर्स या प्राण्यांसाठी स्वेटर्स, जॅकेट्स आहेत मात्र त्यासाठी फारशी मागणी नाही. सध्या पग, लॅब्रॅडोर, डॉबरमन या जातीच्या कुत्र्यांसाठीच्या कपडय़ांसाठी अधिक मागणी आहे. या शिवाय थंडीसाठी श्ॉम्पू, च्युस्टीक्स यांच्याही कलेक्शनला मागणी आहे. ’

संकेतस्थळेही सज्ज
अॅमेझॉन, स्नॅपडील, इबे यांसारख्या संकेतस्थळांवरही कुत्र्यांसाठीचे स्वेटर्स, जर्किन्स उपलब्ध आहेत. काही संकेतस्थळांवर सवलतीही आहेत. वेगवेगळ्या परदेशी ब्रँड्सनीही पाळीव प्राण्यांसाठीचे स्पेशल ‘विंटर कलेक्शन’ जाहीर केले आहेत. आपल्या कुत्र्याचे आदल्यावर्षी वापरलेले स्वेटर्स ओएलएक्स, क्विकरवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2016 3:28 am

Web Title: sweaters for domestic dogs
Next Stories
1 ‘मराठी रीडर डॉट कॉम’च्या माध्यमातून सहा प्रकाशकांची पुस्तके एकाच छताखाली
2 श्रीपाल सबनीस प्रकरणी अजित पवारांचा भाजपला सल्ला
3 नाशिकच्या संस्कृत पाठशाळेस सरस्वती उपासना पुरस्कार
Just Now!
X