सुरक्षेच्या कारणावरून पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील ७० जलतरणतलावांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘सात दिवसांत सुरक्षेच्या तरतुदी पूर्ण करा नाहीतर तरणतलाव बंद करा,’ असे या नोटिसांचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे या तरणतलावांमधील बहुसंख्य तलाव खासगी सोसायटय़ांचे आहेत.
सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील ३५० तरणतलाव तपासले आहेत. यातील ७० तरणतलावांना सुरक्षेची उपकरणे आणि पोहणाऱ्यांच्या सुरक्षिततेसंबंधीचे इतर उपाय नसल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. या ७० तरणतलावांमध्ये कोथरूड, बिबवेवाडी, कोंढवा, औंध, हडपसर यासह मध्य पुण्यातीलही ८-१० तलावांचा समावेश आहे.
डॉ. वावरे म्हणाले, ‘‘तरणतलावांवर प्रमाणित लाईफ गार्ड, दोरी, बांबू असे साहित्य आणि सुरक्षा उपकरणे असणे आवश्यक आहे. नोटिसा दिलेल्या ७० तलावांमध्ये प्रामुख्याने सोसायटय़ांच्या तरणतलावांचा समावेश आहे. या तरणतलावांनी ७ दिवसांत सुधारणा करणे अपेक्षित असून क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या तलावांना पुन्हा भेटी देऊन तपासणी करणार आहेत. दिलेल्या मुदतीत सुरक्षेबाबतच्या तरतुदींची पूर्तता न झाल्यास हे तरणतलाव बंद करण्याची कारवाई पालिकेकडून केली जाईल. शहरातील इतर तरणतलावांमध्ये प्राथमिक सुरक्षा उपकरणे व सुरक्षेबाबतच्या इतर तरतुदींची पूर्तता केलेली आढळली.’’