राज्यातील सर्वात मोठ्या निवारा केंद्रात उपाययोजना सुरू

पुणे : हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयातील सिंहांना करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील ३२ बिबट्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. दिवसभरातून बिबट्यांची तीनवेळा तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येत असून गरज भासल्यास बिबट्यांची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. माणिकडोह हे बिबट्यांसाठीचे सर्वात मोठे निवारा केंद्र आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

मार्जार कुळातील प्राण्यांना करोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात असताना भारतीय वन्यजीव प्राधिकरणाकडून देशभरातील सर्व प्राणिसंग्रहालये तसेच निवारा केंद्रांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात सध्या ३२ बिबटे आहेत. त्यांची विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

बिबट्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. माणिकडोह निवारा केंद्राला तांत्रिक मदत मिळावी, यासाठी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या संस्थेतील आठ कर्मचारी तसेच वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे. बिबट्यांची विष्ठा आणि राहिलेल्या खाद्यपदार्थांची  विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आह. बिबट्यांच्या पिजऱ्यांची जंतुनाशकाने दररोज सफाई करण्यात येत आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

माणिकडोह निवारा केंद्रात ३२ बिबटे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली तसेच जंगलतोडीमुळे बिबटे ऊसशेतीत वास्तव्यास आले. १९९५ नंतर बिबट्यांचा ग्रामीण भागात शिरकाव होऊ लागला. तेव्हापासून या भागात मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष वाढला. बिबट्यांकडून हल्ले करण्यात आले. त्यानंतर बिबट्यांना पकडणे तसेच संगोपन करण्यासाठी २००२ मध्ये राज्यातील पहिल्या निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली. २००५ ते २००७ या कालावधीत बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले होते. वनविभागाने बिबट्यांना पकडणे तसेच जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली. बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सध्या या केंद्रात ३२ बिबटे आहेत. एकूण मिळून ४० बिबट्यांना ठेवण्याची क्षमता या केंद्रात आहेत. नाशिक, संगमनेर, मुंबई, नगर परिसरात पकडलेले बिबट्यांना या केंद्रात ठेवण्यात आले आहे.

बिबट्यांची करोना चाचणी

दिवसभरात बिबट्यांची तीन वेळा वैद्यकीय तज्ज्ञांकडून तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखील बनगर यांच्याकडून बिबट्यांची नियमित तपासणी केली जाते. केंद्रात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येत नाही. एखाद्या बिबट्यात करोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित त्याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. विलगीकरणासाठी स्वतंत्र पिंजरे ठेवण्यात आले आहेत. गरज भासल्यास बिबट्यांची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. बिबट्यांना देण्यात येणारे मांस उकळत्या पाण्यात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना मांस दिले जाते. संसर्गापासून बिबट्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व पातळीवर काळजी घेण्यात येत आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.