या गाडीवर मिळणार रोजचा मेनू बदलता असतो… वर्षानुवर्षे इथल्या पदार्थांची चव बदललेली नाही… चवीमुळे आणि मालकाच्या आपुलकीमुळे अनेक जण रोज सकाळी न्याहारीसाठी इथे येतातच… ही सारी वैशिष्ट्ये आहेत मधुच्या गाडीची… मधू म्हणजे मधुकर शानभाग. टिपीकल कोकणी माणूस. टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच्या गल्लीत उभी असलेली मधुची गाडी पुणेकर खवय्यांचे हक्काचे ठिकाण बनलीये. याच गाडीवर मिळणारी मटार उसळ म्हणजे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ. मल्टिक्युझिनच्या जमान्यात मटार उसळ मिळणारी पुण्यातील हक्काची ठिकाणं कमी होत चालली आहेत. सध्या दोन-तीन ठिकाणी चविष्ट मटार उसळ मिळते, त्यापैकी एक म्हणजे मधुची गाडी.
मधुच्या गाडीवर दररोज न्याहारीसाठी येणारे अनेक ग्राहक असल्यामुळे इथे रोजचा मेनू वेगळा असतो. म्हणजेच सोमवार, गुरुवार आणि शनिवार इथे इडली सांबार, उडीद वडा सांबार, काकडी खिचडी असे पदार्थ मिळतात. बुधवार आणि रविवार मिसळ, भजी मिळते तर मंगळवार आणि शुक्रवार मटार उसळ, अननस शिरा, भजी हे पदार्थ असतात. त्यामुळे तुम्हाला जर इथल्या मटार उसळची चव चाखायची असेल, तर मंगळवारी किंवा शुक्रवारीच इथे जावे लागेल. आलं, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचं विशिष्ट पद्धतीने वाटण करून ते इथल्या मटार उसळीमध्ये वापरले जाते. त्यासोबत काही वेगळे मसाले घातल्यामुळे मटार उसळीला उत्तम चव येते. आणखी एक म्हणजे संकष्टी चतुर्थीला वरीलपैकी कोणताच पदार्थ न ठेवता केवळ काकडी खिचडी आणि उपवासाची मिसळ एवढे दोनच पदार्थ मधूकडे मिळतात. अर्थात त्यांची चवही बेस्टच असते.
भजी सोडली तर इतर सर्वच पदार्थ घरी बनवून गाडीच्या ठिकाणी आणले जातात. गाडीवर फक्त ते गरम करून ग्राहकांना सर्व्ह केले जातात. इथल्या मटार उसळीमध्ये वरून थोडी शेवही टाकली जाते. त्यामुळेही त्याची लज्जत आणखीनच वाढते. चटणी, सांबार, किंवा सॅम्पल जास्तीचे हवे असेल, तर महागाईच्या नावाखाली सर्रास एक्स्ट्रा पैसे घेतले जातात. मात्र, इथे मधुकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाहीये. मधू स्वतः समोर उभ्या असलेल्या ग्राहकाला सांबार देऊ का… रस्सा हवाय का… असं आपुलकीनं विचारत असतो आणि त्याच्या डिशमध्ये घालतही असतो. येणारे बरेचसे ग्राहक रोजचं असल्यामुळे खाण्यासोबतच या गाडीवर त्या त्या दिवसातील हॉट टॉपिकवर चर्चाही रंगते. कधी सचिनच्या निवृत्तीचा विषय असतो तर कधी नरेंद्र मोदींच्या सभेचा… येणारे सगळेच पुणेकर असल्यामुळे विषय कोणताही असला, तर प्रत्येकाचं सगळ्या विषयांवर स्वतःचं मत असतं आणि ते मांडण्यासाठी व्यासपीठ बनतं मधुची गाडी.
मधुच्या गाडीवर कधी मटार उसळ खायला गेलात, तर तिथे मिळणारी कांदा भजी नक्की खाऊन बघा. कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सध्या मधूकडे कोबी भजी हा अफलातून पदार्थ मिळतोय. अतिशय खुसखुशीत आणि गरमा-गरम भजी आणि सोबत मटार उसळ हे पदार्थ नुसते बघितले, तरी कोणालाही भूक लागू शकते. कित्येक वयस्कर गृहस्थ सकाळी सकाळी फक्त भजी खाण्यासाठी मधूकडे येत असतात. दररोज सकाळी आठ वाजल्यापासून मधुच्या गाडीवर सुरू झालेला हा ‘न्याहारी यज्ञ’ पदार्थ संपेपर्यंत सुरू असतो. वर्षातून फक्त दोन वेळा म्हणजेच दिवाळीला आणि होळीला ही गाडी सलग ५-६ दिवस बंद असते.
मधुच्या गाडीवर मिळणारे सगळेच पदार्थ उत्तम असले, तरी ‘मटार उसळ’ ही त्याची खासियतच म्हणायला हवी. मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं तर युनिक सेलिंग पॉईंट! अर्थात मधुला हे असले यूएसपी वगैरे काही कळत नसावं. त्याला फक्त एवढचं माहितीये की अस्सल खवय्या पुणेकरांना खूष करायचं असलं, तर मटार उसळीसोबत आपुलकी आणि मायाही वाढावी लागते आणि याबाबतीत त्याला १०० पैकी १०० गुण!
– विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@expressindia.com

Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद