व्यवस्थापनाच्या निषेधार्थ साडेचार हजार कामगारांची निषेध रॅली

टाटा मोटर्स कंपनीतील व्यवस्थापन व कामगारांमध्ये वेतनवाढ करारावरून सुरू असलेल्या संघर्षांने बुधवारी वेगळे वळण घेतले. जेवणावरील बहिष्कार कायम ठेवून जवळपास साडेचार हजार कामगारांनी मूक रॅली काढून निषेध व्यक्त केला. तर, कामगार प्रतिनिधींनी सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रकल्पप्रमुखांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. व्यवस्थापनाच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ यापुढे कंपनीच्या कोणत्याही कार्यक्रमास सहकार्य करण्यात येणार नाही, असा निर्धारही कामगार संघटनेने व्यक्त केला आहे.

वेतनवाढ करारावरून निर्माण झालेल्या वादामुळे टाटा मोटर्सच्या कामगारांचा नाष्टा व जेवणावरील बहिष्कार बुधवारी पाचव्या दिवशीही कायम राहिला. व्यवस्थापन आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने सुमारे साडेचार हजार कामगार दुपारी जेवणाच्या सुट्टीत एकत्र जमले. त्यांनी कंपनीच्या अंतर्गत भागात निषेध रॅली काढून निषेध व्यक्त केला. तर, कामगार प्रतिनिधींनी प्रकल्पप्रमुख संगनमाथ दिग्गे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या केला. जेवणाची सुट्टी संपल्यानंतर दिग्गे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दुसरीकडे, कामगारांनी कंपनीतील जे. आर. डी टाटा यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुन्हा कामावर रुजू होण्याची भूमिका घेतली. दिग्गे यांना दिलेल्या निवेदनात कामगारांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली आहे.

वेतनकराराच्या बाबतीत कंपनीने अनेक अवाजवी आणि अव्यवहार्य मुद्दे मांडून कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या प्रगतीसाठी कामगारांनी व्यवस्थापनाच्या अनेक उपक्रमांमध्ये कायम सहकार्य केले, तरीही कंपनीने कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आडमुठेपणाचे व नकारात्मक धोरण ठेवले आहे. याच्या निषेधार्थ यापुढे कामगार लालफीत लावून काम करतील, व्यवस्थापनाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत आणि कंपनीचा नाष्टा व जेवणही घेणार नाहीत, असे पत्र संघटनेने दिग्गे यांना दिले आहे.