देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील (आयआयएम) व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (कॅट २०१९) निकालात महाराष्ट्राचा झेंडा फडकला. किमान दहा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाइल मिळवले असून त्यातील चार विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.

आयआयएम कोझिकोडने शनिवारी कॅट २०१९चा निकाल संकेतस्थळाद्वारे जाहीर केला. देशभरातील १५६ शहरांतील ३७६ केंद्रांवर २४ नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. यंदा १ लाख ३४ हजार ९१७ मुले, तर ७५ हजार ४ मुली आणि पाच तृतीयपंथीयांनी ही परीक्षा दिली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक होती, असे आयआयएम कोझिकोडने नमूद केले आहे.

या वेळच्या निकालातही अभियंत्यांनीच वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे. शंभर पर्सेटाइल मिळवणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आठ विद्यार्थी आयआयटीचे, तर दोन विद्यार्थी एनआयटीचे आहेत. शंभर पर्सेटाइल मिळवलेल्या दहा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. तर उर्वरित  झारखंड, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आहेत. तर २१ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेटाइल मिळाले आहेत. त्यापैकी १९ विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पाश्र्वभूमी असलेले आहेत. अग्रस्थान मिळवलेल्यांमध्ये यंदा एकाही मुलीचा समावेश नाही. प्रामुख्याने आयआयएममधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅट घेतली जात असली, तरी अन्य आघाडीच्या व्यवस्थापन महाविद्यालयांकडूनही प्रवेशासाठी कॅटमधील गुण विचारात घेतले जातात.

जानेवारीपासून कॅटची तयारी सुरू केली होती. मात्र, ऑगस्टपासून सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर देऊन अधिक गांभीर्याने अभ्यास सुरू केला. सराव प्रश्नपत्रिकांप्रमाणेच गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचाही आढावा घेतला. आता मला आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

– सोमांश चोरडिया, आयआयटी मुंबई</p>