हवेली तालुक्यात ग्रामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज करोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याने थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा कोवीड-१९ च्या स्वॅब तपासणीकरीता बंद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
हवेलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडील अहवालानुसार करोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणाऱ्या आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापूर (ता. हवेली) येथील धुमाळ कुटुंबातील व्यक्तींनी करोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
या अहवालाच्या निष्कर्षावर कुटुंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, सर्व धुमाळ कुटुंबाचे पुनः तपासणीनंतरचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला असल्याने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 3:27 pm