‘‘गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे अवकाशाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन करणे शक्य होणार आहे. या संशोधनाबाबतचा ‘लायगो इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात राबवला जाईल. लेझर तंत्रज्ञान, जीपीआरएस तंत्रज्ञान तसेच उच्च प्रतीच्या गणनप्रक्रियांमध्येही त्याचा उपयोग होणार आहे,’’ असे प्रतिपादन ‘आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्रा’तील (आयुका) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर यांनी व्यक्त केले.
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या पुणे विभागातर्फे ‘आईनस्टाईन सेंटेनिअल गिफ्ट : ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज डिस्कव्हर्ड’ या विषयावर रविवारी धुरंधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संस्थेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, माजी कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा या वेळी उपस्थित होते.
धुरंधर म्हणाले,‘‘गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत १९१६ मध्ये मांडला गेला. शंभर वर्षांच्या संशोधनानंतर गुरुत्वीय लहरी शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
येत्या काळात खगोलशास्त्रातील अनेक नवी दालने उघडण्यासाठी गुरुत्वीय लहरींचा शोध महत्त्वाचा ठरेल.
कृष्णविवरासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठीही तो उपयुक्त ठरेल.’’ ‘‘शंभर वर्षांच्या या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा वाटा असून ‘आयुका’ने यासंबंधीचा प्रस्ताव पूर्वीच मांडला होता.
डॉ. धुरंधर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिकाटीने या संशोधनासाठी काम केले,’’ असे नारळीकर यांनी सांगितले.