कंगना रणौत जर ड्रगिस्ट असेल तसं ती बोलली असेल तर त्याबाबतची सत्यता पडताळून तिची देखील चौकशी झाली पाहिजे. असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते, त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, “कंगनाची शंभर टक्के ड्रगिस्ट असेल, असं बोलली असेल तर चौकशी व्हावी, या विषयाच्या अनुषंगाने कंगना बोलते म्हणून नाही. पण आपल्या वैभवशाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर नवोदीत कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याचं दिसत असेल, तर कुणीही याला पाठिशी घालायचं कारण नाही. कंगनाच्या माध्यमातून विषय जर ऐरणीवर आला असेल, एवढी मोठी आपली फिल्म इंडस्ट्री आहे व त्यात जर ड्रग्जचे व्यसन जडत असेल, तर आपण काळजी घ्यायला नको का? मग ते कोणीही असो, कोणाच्याही संबंधीत असो.”

आणखी वाचा- ठाकरे सरकार अहंकारी, आमच्या सूचनांची दखल घेत नाही – दरेकर

तसेच, “मला वाटतं ड्रग्जचे व्यसन हे फिल्म इंडस्ट्रीच्या हिताचं नाही. केवळ फिल्म इंडस्ट्री नाही तर आपल्या देशात अशाप्रकारे अंमली पदार्थाचा विळखा होता कामानये, कुणीही असो अशाप्रकारची भूमिका असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करण्याची आवश्यकता आहे का? जर ड्रग्ज घेत असतील एनसीबीने चौकशीला बोलावलं तर कुणाच्या पोटात का कशासाठी दुखायला पाहिजे? कंगना जर ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी. कंगना थोडी या देशाची वेगळी नागरिक आहे, सगळ्यांना न्याय तोच कंगनाला न्याय. कायदा हा आपल्या देशात सर्वांना सारखा आहे.” असं यावेळी दरेकर यांनी सांगितलं.