पुणे शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मंगळवारी तीन नव्या रुग्णांचा ससून रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या तीनही रुग्णांना विविध आजार होते. यामुळे पुण्यात आत्तापर्यंत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात आज (मंगळवारी) सकाळी ९ ते ११ या वेळेत तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या तिघाही मृतांचे वय ६० वर्षांपुढील आहे. यांपैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.

दरम्यान, शहरातील काही भागांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे, अशा भागांना पूर्णपणे सील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं सोमवारी घेतला. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी सील करण्यात आले. यामध्ये शहरातील मध्य वस्तीतील पेठांचा भाग, कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओपर्यंतचा भाग यांचा समावेश आहे. याच सर्व भागांमध्ये दाट लोकवस्ती आहे.