पीएमपी सेवेत झपाटय़ाने सुरू असलेल्या सुधारणांना आता वेळापत्रकाचीही साथ देण्यात येणार आहे. विविध सुधारणा केव्हापर्यंत पूर्ण करायच्या याची मुदत अधिकारी व कर्मचाऱ्यांना घालून देण्यात आली असून त्यानुसार ताफ्यातील सर्व गाडय़ांची दुरुस्ती २० मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल. जुन्या गाडय़ांचे प्रथमदर्शनी स्वरूप चांगले असावे यासाठी रंगरंगोटीचेही काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पीएमपीच्या सर्व गाडय़ांचे वेळापत्रक ३० मार्चपर्यंत मोबाईल अॅपसह संकेतस्थळावरही उपलब्ध होणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील किमान ऐंशी टक्के गाडय़ा मार्गावर आणण्याच्या प्रयत्नापासून सेवा सुधारण्याचा कृती कार्यक्रम सुरू झाला आहे आणि विशेष म्हणजे पंचाहत्तर टक्के गाडय़ा आता रोज मार्गावर येत आहेत. डॉ. श्रीकर परदेशी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार घेण्यापूर्वी पीएमपीच्या चाळीस टक्के गाडय़ा मार्गावर येत होत्या. ही टक्केवारी सातत्याने वाढत आहे. गाडय़ा मार्गावर आणण्याची मोहीम यशस्वी होत असतानाच आता सर्व गाडय़ांची किरकोळ व अन्य दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. गाडय़ांचे पुढील बंपर तसेच बाक यासह ज्या ज्या दुरुस्त्या आवश्यक असतील, त्या दुरुस्त्या केल्या जात असून हे काम पूर्ण करण्यासाठी २० मार्च ही मुदत आहे. त्या मुदतीत इंजिन वगळता अन्य सर्व दुरुस्ती पूर्ण केली जाईल. ज्या गाडय़ांच्या इंजिनचे काम करावे लागणार आहे अशा २२५ गाडय़ा असून त्या पूर्णत: दुरुस्त व्हायला काही कालावधी व मोठा खर्चही येणार आहे. मात्र त्या दुरुस्ती कामाचेही नियोजन करण्यात आले आहे.
पीएमपीच्या गाडय़ांची स्थिती चांगली असली, तरी अनेक गाडय़ांचे बाह्य़स्वरूप अतिशय अनाकर्षक आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या पीएमपीच्या सर्व गाडय़ा रंगरंगोटी केलेल्या असतील आणि त्या प्रथमदर्शनी चांगल्या दिसतील असेही काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या दोनशेहून अधिक गाडय़ांना रंगरंगोटी केली जात आहे. ताफ्यातील सर्व गाडय़ा रस्त्यावर धावताना चांगल्या दिसतील, अशी योजना आहे.
पीएमपी प्रवाशांकडून वेळापत्रकाची सातत्याने मागणी होते. मात्र मार्गाचे सुसूत्रीकरण झालेले नसल्यामुळे वेळापत्रक निश्चित करणे व ते प्रसिद्ध करणे यात काही अडचणी होत्या. मार्गाचे सुसूत्रीकरण हाती घेण्यात आले असून वेळापत्रकही तयार केले जात आहे. या महिनाअखेर पीएमपी प्रवाशांना पीएमपीच्या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध होईल. त्याचे मोबाईल अॅप्लिकेशनही तयार करण्यात येत असून तेही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

संस्था-संघटना, तज्ज्ञांचा पुढाकार
पीएमपीची सेवा कार्यक्षम करण्यासाठी ज्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्याचे स्वागत होत असून सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक संस्था-संघटना, तज्ज्ञ आणि नागरिकांनी साहाय्य करण्याची तयारी स्वत:हून दर्शवली आहे. अनेक कंपन्याही पुढे येत आहेत. आमच्या शहरासाठी चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा असावी यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त होत असून हा पुढाकार निश्चितच चांगला आहे.
डॉ. श्रीकर परदेशी (अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)