प्रमाणपत्रे, गुणपत्रे यांची पडताळणी होण्यात पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दिरंगाई होत असल्यामुळे कंपन्यांची भरती रखडली असल्याची तक्रार काही कंपन्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कँपस इन्टरव्ह्य़ूमध्ये नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बहुतेक साऱ्या कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करताना उमेदवारांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके यांची पडताळणी केली जाते. कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर केली, की त्याची पडताळणी कंपनीचा मनुष्यबळ विकास विभाग करतो किंवा त्याचे काम स्वतंत्र यंत्रणेला देण्यात येते. गुणपत्रके आणि प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे महिन्याला शेकडो अर्ज कंपन्या करत असतात. उमेदवाराने कंपनीला दिलेली कागदपत्रे खरी आहेत, उमेदवाराचे गुण किंवा प्रमाणपत्रावरील श्रेणी खरी आहे, याची खातरजमा करून विद्यापीठ कंपनीकडे अहवाल देत असते.
विद्यापीठाने कंपनीकडे अहवाल दिल्याशिवाय कंपनीला पुढील प्रक्रिया करता येत नाही. अनेकदा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये कँपस इन्टरव्ह्य़ू घेऊन विद्यार्थ्यांना नोकरीची संधी कंपनी देत असते. पण त्यावेळीही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून हे पडताळणीचे काम सध्या कासवाच्या गतीने सुरू आहे. त्यामुळे काही कंपन्यांची भरती रखडली असल्याची तक्रार मनुष्यबळ विकास कंपन्यांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी कँपस इन्टरव्ह्य़ू मधून निवडलेल्या उमेदवारांच्या नोक ऱ्याही कागदपत्रांची पडताळणी वेळेत न झाल्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.