फेसबुकवर किंवा आणखी कुठल्या सोशल मीडिया वेबसाईटवर आपण सगळे वेळ घालवत असतो. पण काही तरूणांनी इंटरनेटच्या माध्यमातून सध्या राज्यात ज्वलंत असलेला तुरीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आणि त्याला ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या तरूणांनी शेतकरी सन्मान परिषद या नावाने पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये तूरडाळ महोत्सव भरवला. या महोत्सवाला शेतकरी तसंच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सरकारने हमी दिलेल्या ५ हजार ५० रुपयांच्या दराने आयोजकांनी राज्यातल्या ग्रामीण भागातील विविध ठिकानाहून आणलेली तूर खरेदी केली होती.त्याची नफा ना तोटा पद्धतीने आज भोसरी येथे विक्री करण्यात आली. रविवारी दिवसभरात २ क्विंटल तूरडाळ विकली गेली. तसंच या तूरडाळीचं आॅनलाईन बुकिंग करण्याचीही सुविधा या तरूणांनी करून दिली.

एकीकडे फेसबुकचा वापर हा केवळ मनोरंजनासाठी आणि आपला वेळ घालवण्यासाठी केला जातो. मात्र या तरुणांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत एक टीम तयार केली आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तूर खरेदी करत तूर महोत्सव भरवला. त्यांच्या या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक होतंय.

यात नफा आहे की तोटा याचा विचार न करता हे तरुण पुढे आले आहेत.आज येथील नागरिकांनी शेतकऱ्याला मालाला चांगला भाव द्यायला पाहिजे अशी अपेक्षा बाळगताना शेतकऱ्यांच्या थेट तूरडाळ विक्रीला आम्ही ५ ते १० रुपये जास्त देऊ अशीदेखील चांगली भूमिका घेतली. ८ मे रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत तूरडाळ महोत्सव चालणार आहे.त्यामुळे उद्याही पिंपरी चिंचवड चे नागरिक तूरडाळ खरेदी करू शकतात.