संगीत या एका आवडीतून एकत्र आलेल्या युवकांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना हक्काचे घर मिळावे या भावनेतून लघुपटाच्या माध्यमातून हा विषय हाताळला. केवळ लघुपटाची निर्मिती करूनच हे थांबले नाहीत. तर, भूतदयेचे उदाहरण घालून देत या भटक्या कुत्र्यांचे पालकत्व स्वीकारून त्यापैकी काही कुत्री दत्तकही दिली आहेत.
‘टच हार्ट म्युझिक’ या सहा मिनिटांच्या लघुपटाच्या निर्मितीसाठी शंतनू नायडू याने सर्वाची मोट बांधली आहे. तो या लघुपटाचा दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. रवीना बक्षी आणि सना सोहोनी यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. दिलीप सुतार याने छायाचित्रण केले असून सुकृत टेणी याने संकलनाचे काम केले आहे. केदार खिरे याने सिंथेसायझर तर शार्दूल बापट याने व्हायोलिनवादन केले आहे. आरुष डांगे याच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. ‘पॉज फॉर ए कॉज’ या मोहिमेअंतर्गत या व्हिडिओ क्लीपची निर्मिती करण्यात आली असून या सीडीचे प्रकाशन प्रसिद्ध पर्कशनिस्ट उस्ताद तैफिक कुरेशी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या युवकांपैकी शंतनू हा एकमेव पदवीधर असून उर्वरित अद्याप शिक्षण घेत आहेत. संगीताच्या धाग्याने त्यांना जोडले असून अभ्यासाव्यतिरिक्त प्रत्येकजण वेगवेगळा छंद जोपासतो. या सर्वानी यापूर्वी बालकामगारांच्या प्रश्नाचा वेध घेणारा लघुपट बनविला होता.
तौफिक कुरेशी यांनी या फिल्मची िलक माझ्या फेसबुकवर त्याचप्रमाणे यू-टय़ूबवर टाकून प्रचार करेन अशी ग्वाही दिली. हा लघुपट पाहून मला या विषयाचे महत्त्व तर पटलेच. पण, कुत्र्याविषयी ममत्व वाटू लागले. भटक्या कुत्र्यांना प्रेम देण्याबरोबरच त्यांची काळजी आणि चांगले कुटुंब मिळावे यासाठी हे युवक चांगला प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत तौफिक यांनी प्रशंसा केली.
आम्ही केवळ ही फिल्म केली नाही, तर प्रत्येकाने घरामध्ये एक कुत्रा पाळला आहे, असे शंतनू याने सांगितले. भटक्या कुत्र्यांचे पालकत्व स्वीकारले असून यापैकी १५ कुत्र्यांना दत्तक दिले आहे. ज्यांच्या घरी कुत्रा दिला त्या घरामध्ये प्रत्येकाला किमान आठवडाभरात कुत्र्याचा लळा लागतो, असा आमचा अनुभव आहे. कुत्र्याची काळजी घेता येणे शक्य नसेल तर, त्याला रस्त्यावर सोडू नका असे आवाहन आम्ही करतो. कुत्र्यांना मदत करणारे काही ‘अनसंग हिरो’ आम्हाला ठाऊक आहेत, असेही शंतनूने सांगितले.