News Flash

टोलची वसुली जोमात सुरू; बोगद्यातील दिवे मात्र बंदच

पुणे- सातारा रस्त्यावर वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर टोलची वसुली होत असताना रस्त्यावर दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार खंबाटकी घाटात दिसून येतो. मागील अनेक दिवसांपासून

| February 14, 2013 11:35 am

पुणे- सातारा रस्त्यावर वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर टोलची वसुली होत असताना रस्त्यावर दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार खंबाटकी घाटात दिसून येतो. मागील अनेक दिवसांपासून खंबाटकी बोगद्यातील बहुतांश दिवे बंद असताना या भागातील वाहतूक धोकादायक झाली असतानाही संबंधित यंत्रणांकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते आहे. दिवे सुरू करण्याला प्राधान्य देण्याऐवजी बोगद्यात अंधार असल्याची कबुली देणारा फलक मात्र बोगद्याबाहेर लावण्यात आला आहे.
पुणे- सातारा मार्गाचे सहापदरीकरण व संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट रिलायन्स कंपनीला देण्यात आले आहे. २०१० मध्ये हे कंत्राट देण्यात आले असून, त्याची मुदत यावर्षी ३१ मार्च रोजी संपत आहे. या दरम्यान टोलचे दर चार वेळा वाढविण्यात आले आहेत. असे असतानाही सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने लक्ष दिले जात नसल्याचा खंबाटकी बोगद्यातील प्रकारावरून दिसून येत आहे. सुमारे दोन वर्षांपासून बोगद्यातील पन्नास टक्के दिवे बंद आहेत. त्यामुळे या भागात गंभीर अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर हे या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वाहनचालकांना सुविधा दिल्या जात नसताना टोल कशासाठी घेतला जातो, असे प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. वेलणकर यांनी पुन्हा नव्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याबाबत पत्र दिले असून, त्यात हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिव्यांअभावी बोगद्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात झाल्यास त्यास प्राधिकरण व संबंधित कंत्राटदार जबाबदार राहील, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 11:35 am

Web Title: traffic in khambatki tunnel is dangerous
Next Stories
1 बँकांतून रक्कम घेऊन जाणाऱ्यांस लुटणारी गुजरातमधील टोळी गजाआड
2 ओवैसी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका
3 जादूटोणाविरोधी कायद्यासाठी अंनिसतर्फे शिवजयंतीपासून सह्य़ांची मोहीम
Just Now!
X