पिंपरी महापालिकेतर्फे जलद वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटरमध्ये झालेल्या तांत्रिक चुकीमुळे ठरावीक कालावधीनंतर त्यात अवजड वाहने अडकतात. याच प्रकाराची शुक्रवारी सकाळी पुनरावृत्ती झाली. ऐन गर्दी व मोठी वाहतूक सुरू असताना एक मोठा कंटेनर ग्रेड सेपरेटरमध्ये अडकल्याने वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीमुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली.
पिंपरी पालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या दापोडी ते निगडी दरम्यानच्या १२ किलोमीटर रस्त्यात काही ठिकाणी ग्रेडसेपरेटर करण्यात आले आहेत. ठरावीक उंचीच्या वाहनांनाच येथून जाता येते. तथापि, परराज्यातील वाहने किंवा ज्यांना याबाबतची माहिती नाही, ते या मार्गावर येतात आणि त्यांची वाहने या ग्रेडसेपरेटरमध्ये अडकतात, असा अनुभव आहे. दर दोन-तीन महिन्यात एकदा असा प्रकार घडतो. ज्या दिवशी कंटेनर किंवा अवजड वाहतूक करणारी वाहने अडकतात त्या दिवशी वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडते.
वारंवार घडणाऱ्या या प्रकाराबाबत महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनाही ठोस उपाययोजना करता आलेली नाही.पिंपरी चौकात शुक्रवारी सकाळी कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. अडकलेला कंटेनर काही केल्या निघत नव्हता. हा रस्ता रहदारीचा असल्याने थोडय़ाच वेळात कोंडी झाली. बऱ्याच प्रयत्नांनंतर कंटेनर बाजूला काढण्यात पोलिसांना यश आले आणि वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.