पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

करोना विषाणूंने मागील सहा महिन्यापासून जगभरात थैमान घातले आहे. या आजारामुळे लाखो नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या देशात देखील या आजाराचे रुग्ण आढळत असून अशीच परिस्थिती पुणे शहरात देखील पाहण्यास मिळत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुण्यातील रूग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे नव्याने बाधित होणार्‍या रुग्णांना रूग्णालयात जागा मिळत नाही. त्यामुळे सद्यस्थितीला घरीच उपचार करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. मात्र, काही रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर ८०० बेडचे जम्बो कोविड केअर रूग्णालय उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी झालेल्या या रूग्णालयाचे कौतुक करीत, शहर आणि ग्रामीण भागातील कोणत्याही रूग्णांना उपचार दिले जातील, मृत्यू होणार नाहीत. याबाबत निश्चित सर्व यंत्रणा काळजी घेईल असे त्यावेळी भाषणात ऐकण्यास मिळाले होते. या कार्यक्रमाला आठवडा आणि रुग्णालय सुरू होऊन चार दिवस होत नाही. तोवर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्व सुविधांनी सुसज्ज रूग्णालयात मृत्यू झाल्याने, पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

या घटनेबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जम्बो कोविड केअर रुग्णालयात दोन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला.