लोकप्रतिनिधींनी लोकहितासाठी जगले पाहिजे. ज्यांच्यामुळे पदे मिळतात त्यांनाच चिरडण्याचा प्रयत्न केला, तर लोक घरात शिरून मारतील. न्याय मिळत नाही तेव्हा नक्षलवाद जन्माला येतो. न्याय मिळत नसेल, तर लोकही तयार आहेत. आता टायमर सुरू झालाय, जनक्रांतीची चिन्हे आहेत. लोक काय करतील याचा नेम नाही. अशा स्थितीत नक्षलवाद्यांचा नेता होण्याची वेळ आली तर मी मागे हटणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
भोसले म्हणाले, देशात कुणाचा धाक राहिला नाही. दाभोलकरांना गोळी घालण्यात आली. पानसरेंना मारले. या गोष्टीचा केवळ निषेध करून उपयोग नाही. लोकांना कृती हवी आहे. चार-सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतात. या प्रकारांची मला लाज वाटते. असल्या लोकांना भर चौकात आणून गोळय़ा घातल्या पाहिजेत. आपण महासत्तेकडे की विनाशाकडे चाललोय हेच समजत नाही. ‘एमपी’चा अर्थ मी खासदार असा घेत नाही. ‘एमपी’ म्हणजे मिलिटरी पोलीस आहे.
काम न करणाऱ्या आजी-माजी आमदारांना, मंत्र्यांना लोकांनी जाब विचारला पाहिजे, असे सांगून भोसले म्हणाले, यापूर्वी आघाडीचे सरकार होते. आता बहुमतातील सरकार आहे. दम असेल, तर सरकारने कामे करून दाखवावीत, केवळ घोषणांना लोक कंटाळले आहेत. भांडवलदारांनी भांडवलदारांसाठी चालविलेले सध्याचे सरकार आहे. भारतातील नागरिकांना हुकूमशाही आवडत नाही, हे दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले आहे. दिल्लीचा कौल ‘आप’ला नव्हे, तर तो हुकूमशाहीच्या विरोधात होता. वेळीच शहाणे झाला नाहीत, तर दिल्लीत घडले ते देशातील प्रत्येक राज्यात घडेल.

‘कसला आलाय बारामती पॅटर्न!’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीत शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर चर्चा झाली, असे सांगून उदयनराजे भोसले यांनी ‘कसला आलाय बारामती पॅटर्न’ अशी खिल्लीही उडवली. केंद्र शासनाच्या भूसंपादन कायद्याच्या विरोधातील माझी भूमिका ठाम आहे. त्याबाबतीत मी पक्ष व नेता यांना मानत नाही. हिंमत असेल तर सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करून दाखवावी, असेही ते म्हणाले.