पुणे विद्यापीठाशी संलग्न बहुतांश महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे देण्यात आल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. मात्र, अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षाच आता झाल्या, तर विद्यापीठाकडे गूण असतीलच कसे, असा प्रश्न प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.
दोन दिवसांच्या कालावधीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठांकडे देण्यात यावेत, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बहिष्कारी प्राध्यापकांना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्याना दिल्या होत्या. पुणे विद्यापीठामध्ये बहुतेक सर्व महाविद्यालयांकडून परीक्षांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आले असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. याबाबत विद्यापीठाचे महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले, ‘‘पुणे विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा यांचे गुण विद्यापीठाकडे आले आहेत. महाविद्यालयांनी त्यांचा युझर आयडी वापरून परीक्षा विभागाच्या संगणक प्रणालीवर गुण टाकले आहेत. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे कामही सुरळीतपणे सुरू आहे.’’
विद्यापीठाचा हा दावा पुक्टोच्या सदस्यांनी मात्र फेटाळला आहे. पुक्टोच्या अध्यक्ष डॉ. हेमलता मोरे यांनी सांगितले, ‘‘विद्यापीठाकडून प्रत्येक परीक्षेच्यावेळी अंतर्गत गुणांसाठी सीडी पाठवण्यात येते, त्या सीडीमध्ये गुण भरून ती विद्यापीठाला देण्यात येते. मात्र, विद्यापीठाने अजून महाविद्यालयांना सीडी पाठवलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे नाशिक, नगर जिल्ह्य़ातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा अजूनही होत आहेत. परीक्षाच नाहीत, तर गुण कुठले? मात्र, या परीक्षा आमच्या बहिष्कारामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या नाहीत, तर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.’’