पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात या अधिसभेच्या शिफारशीचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव करण्यात यावे, अशी शिफारस विद्यापीठाच्या अधिसभेने रविवारी केली. या शिफारसीचे शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. ‘सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुण्यापासूनच त्यांचे कार्य सुरू केले. आता पुणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नावामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा समावेश करणे उचित ठरेल,’ असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. ‘पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्याची शिफारस करून अधिसभेने सावित्रीबाई फुले, फातीमाबी शेख आणि महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी प्रेरणांचा उचित सन्मान केला आहे, असे एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.