News Flash

धाडसाबद्दल पोलीस शिपायाच्या पाठीवर आयुक्तांकडून शाबासकीची थाप

जिवाची पर्वा न करण्याचे धाडस दाखविणारे पोलीस शिपाई मयूर भोकरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बुधवारी पडली

आपटे रस्त्यावर पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करताना जिवाची पर्वा न करण्याचे धाडस दाखविणारे पोलीस शिपाई मयूर भोकरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप बुधवारी पडली. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी या धैर्याबद्दल भोकरे आणि त्यांचा मित्र संदेश खडके यांचा पोलीस आयुक्तालयामध्ये सत्कार केला. भोकरे यांना दहा हजार रुपयांचे बक्षीसही पाठक यांनी जाहीर केले.
शिवाजीनगर न्यायालयात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी मयूर भोकरे हे मंगळवारी (२२ डिसेंबर) सुट्टीवर होते. मयूर आणि त्यांचा मित्र संदेश हे दोघे दुचाकीवरून महापालिका भवन येथून निघाले होते. त्या वेळी परभणी येथील सराईत गुन्हेगार देवेंद्र देशमुख आणि त्याचा साथीदार अक्षय सोनी हेदेखील दुचाकीवरून तेथून जात होते. देशमुख याने कमरेला पिस्तूल खोचल्याचे मयूर भोकरे यांनी पाहिले. त्यांचा संशय बळावला आणि देशमुख याला त्यांनी हटकले. तेथून देशमुख पसार झाला. पाठलाग करीत भोकरे यांनी त्याला आपटे रस्त्यावर गाठले. त्यांच्यामध्ये झटापट झाली. देशमुख याने मयूर यांच्या पोटाला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने मयूर यांच्या दिशेने गोळीबार केला. ही गोळी बुटाला चाटून गेल्यामुळे मयूर त्यातून बचावले.
मयूर भोकरे यांनी दाखविलेल्या या धाडसाचे कौतुक पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी केले. पोलीस आयुक्तालयामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मयूर आणि संदेश खडके या दोघांचा सत्कार करण्यात आला. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पाटील या वेळी उपस्थित होते.
….
पोलीस हा ‘२४ तास ऑन डय़ूटी’च असतो. हे ध्यानात ठेवूनच मी माझे कर्तव्य चोखपणे बजावले. भविष्यामध्येही मी कामामध्ये तत्पर राहीन. पोलीस आयुक्तांनी केलेल्या प्रशंसेने मी भारावून गेलो आहे.
– मयूर भोकरे, पोलीस शिपाई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:19 am

Web Title: venture police commissioner applause gift mayur bhokre
टॅग : Commissioner
Next Stories
1 जागरूक असेल तरच.. ‘ग्राहक राजा’
2 पुण्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती करा
3 पं. अजय पोहनकर यांना मानद संगीताचार्य पदवी
Just Now!
X