विद्याधर कुलकर्णी लोकसत्ता

नगरसेवक : ऐश्वर्या जाधव, मारुती सांगडे, रेखा टिंगरे, अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे

पुणे : वर्षभरच भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाबरोबरच वैद्यकीय सेवांसाठी थेट येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयाकडे घ्यावी लागणारी धाव या समस्येने प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक त्रस्त आहेत. विकासकामे होत असली तरी त्याला अपेक्षित गती देण्यामध्ये नगरसेवक कमी पडतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

कळस-धानोरी या प्रभागामध्ये हातावर पोट असलेले कष्टकरी आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य आहे. तर, दुसऱ्या बाजूला टोलेजंग इमारतींमध्ये वास्तव्य करणारे नागरिक असेही चित्र आहे. पाणीप्रश्नाचे गांभीर्य नगरसेवकांना पुरेसे नाही. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागते. प्रभागामध्ये पाणी साठवणूक करण्यासाठी टाक्या बांधून झाल्या आहेत. तर, दुसरीकडे भामा-आसखेडचे पाणी प्रभागातील नागरिकांना वापरण्यास मिळण्यास सुरुवात होणार असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

या प्रभागामध्ये ऐश्वर्या जाधव, मारुती सांगडे आणि अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे हे तीन नगरसवेक भारतीय जनता पक्षाचे असून रेखा टिंगरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. या प्रभागातून यापूर्वी किरण जठार निवडून आल्या होत्या. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये ऐश्वर्या जाधव या निवडून आल्यामुळे प्रभागामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक झाले आहेत.

प्रभागामध्ये वैद्यकीय सेवा मिळत नाहीत, अशी नागरिकांची व्यथा आहे. महापालिका दवाखान्यांमध्ये मनुष्यबळ अपुरे आहे. डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे येथील वैद्यकीय सेवा रुग्णांसाठी अडसर निर्माण करणारी ठरते. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी वैद्यकीय सेवेला प्राधान्य द्यावा लागते. मात्र, मोठा आजार असेल तर थेट येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय गाठण्याची वेळ येते.

या प्रभागामध्ये दैनंदिन कचरा दूर केला जातो की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा, इतका कचरा रस्त्यांवर आढळून येतो. विकासकामे करताना सर्व नगरसेवक हे केवळ आपल्या भागापुरताच विचार करतात. त्यामुळे प्रभागाच्या र्सवकष विकासाचा विचार होताना दिसत नाही. पाण्याच्या  टाक्यांचे बांधकाम बरीच वर्षे सुरू होते. आता भामा-आसखेड धरणाचे पाणी प्रभागामध्ये येण्याचे दिवस आले असताना टाक्यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.

नगरसेवकांचे दावे

करोना संकटामुळे विकासकामांसाठी निधी देता आला नाही. तो यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मिळेल.

वैद्यकीय सुविधांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी उपाययोजनांची कार्यवाही सुरू

न्यायप्रविष्ट बाबींमुळे झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित

नागरिक म्हणतात

चार नगरसेवक असले, तरी एकत्रित विचार करून प्रभागामध्ये विधायक विकासकामे झाली असे छातीठोकपणे म्हणणे धाडसाचे ठरेल. प्रभागामध्ये विकास कामांचा विचार हा केवळ नगरसेवकाचे घर असलेल्या परिसराचा केला जातो. कचरा समस्येवर तोडगा काढण्यामध्ये लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत.

– अर्जुन गवळी

कळस-धानोरी हा भाग झपाटय़ाने विकसित होत असताना येथे नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. प्रभागामध्ये कोठेही आग लागली तर ती विझविण्यासाठी येरवडा येथून अग्निशमन दलाची वाहने येतात. त्यांना पोहोचण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रभागामध्ये अग्निशमन दलाचे केंद्र असले पाहिजे.

– केदार सूर्यवंशी

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

प्रभागाचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशातून मतदारांनी चार नगरसेवक निवडून दिले. मात्र, तीन एका पक्षाचे आणि एक दुसऱ्या पक्षाचे आहेत. विकासकामांमध्ये मतभेद असले तरी विकासकामे सुरू आहेत. करोनामुळे त्यामध्ये काहीसा खंड पडला असला, तरी सर्व नगरसेवक आपल्या परीने चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

– सचिन टिंगरे, शिवसेना</strong>

‘सर्वाची जबाबदारी म्हणजे कुणाचीच नाही’ या उक्तीनुसार या प्रभागामध्ये चारही नगरसेवकांचे कामकाज चालते. बास्केटबॉल कोर्ट साकारले होते. त्याची दुरवस्था झाली आहे. कळस गावठाण भागामध्ये डीपी रस्ते विकसित झाले नाहीत. विश्रांतवाडी येथील भाजी मंडई आणि मासळी बाजाराचे स्थलांतर हा प्रश्न अनिर्णीत आहेत. पीएमपीचा डेपो करण्यासाठी कोणीही लक्ष देत नाही.

– सतीश म्हस्के, राष्ट्रवादी

तक्रारींचा पाढा

प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या

पाण्याचा प्रश्न प्रलंबित

वाहतूक वर्दळीचा त्रास

झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न अनिर्णीत

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

लोहगाव विमानतळ रस्ता, टिंगरेनगर, विद्यानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, विश्रांतवाडी, कळस, भैरवनगर, धानोरी

लोकप्रतिनिधी म्हणतात

१९ महिने लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. ख्रिश्चन आणि मुस्लीम दफनभूमीसाठी जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला असून अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. विश्रांतवाडी येथील पथारी व्यावसायिकांना परवाना देऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले आहे. कळस ओटा मार्केट येथे आणि विश्रांतवाडी येथील गाडगीळ शाळेत बहुउद्देशीय सभागृह करण्यात येणार असून कळस येथील महापालिका दवाखान्यामध्ये प्रसूतिगृह साकारण्यात येणार आहे.

– ऐश्वर्या जाधव, नगरसेविका

प्रभागातील नागरिकांसाठी भामा आसखेडचे पाणी मिळावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुलांसाठी राज्यातील पहिले निवासी शिक्षण केंद्र विश्रांतवाडी येथे साकारले जात असून त्याच्या इमारतीचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे करण्यात आली असून नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर असतो.

– मारुती सांगडे, नगरसेवक

धानोरी येथे वन विभागाच्या २८ एकर जागेवर महापालिकेच्या सहकार्याने उद्यान विकसित करण्यात येत आहे. त्याच्या सीमा भिंतीचे काम झाले असून अंतर्गत कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. भामा-आसखेडचे पाणी प्रभागातील नागरिकांना मिळणार असून पाण्याचा प्रश्न सुटेल. पाणी साठवणुकीसाठी २५ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांची उभारणी केली आहे. धानोरी ते फाइव्ह नाइन रस्ता नव्याने विकसित करण्यात येत असून त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. विश्रांतवाडी येथे विज्ञान तंत्रज्ञान वाटिकेसाठी जागा देण्यात आली आहे.

अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, नगरसेवक

भामा-आसखेडचे पाणी मिळावे यासाठी केलेल्या आंदोलनाला यश आले. धानोरी येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात आले असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. माजी सैनिक भवन आणि ध्यानधारणा केंद्र उभारण्यात आले आहे. स्थायी समितीमध्ये काम केले असल्याने विकासकामांसाठी तरतूद करून घेणे शक्य झाले. धानोरी येथे क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ भाजी मंडईचे उद्घाटन झाले असून बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच सभागृह उभारण्यात येणार आहे.

– रेखा टिंगरे, नगरसेविका